Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : शाश्वत सुखाचा शोध संतसाहित्यापाशी येऊन थांबतो – डॉ. पंकज महाराज गावडे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : “शाश्वत सुखाचा शोध संतसाहित्यापाशी येऊन थांबतो!” असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक ह. भ. प. डॉ. पंकज महाराज गावडे यांनी ‘संतत्व आणि साहित्य’ या विषयावर बोलताना केले. ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनातील चौथ्या सत्रात डॉ. पंकजमहाराज गावडे बोलत होते. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास जैद सत्राच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, ह. भ. प. भानुदासमहाराज तापकीर, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

---Advertisement---

ह. भ. प. डॉ. पंकजमहाराज गावडे पुढे म्हणाले की, “सर्वांच्या हिताचे असते ते साहित्य अशी साहित्याची व्याख्या केली जाते. त्या निकषानुसार संतसाहित्य हेच खरे साहित्य आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. विश्वाचे आर्त जेव्हा अंत:करणात प्रकटते अन् त्यातून परतत्त्वाला स्पर्श करणारे संत तत्त्व म्हणजेच संतत्व प्रकट होते. अत्यंत दु:खाची निवृत्ती आणि परम सुखाच्या प्राप्तीचे साधन म्हणजे संतत्व असते. संतसाहित्य हे समाजोगामी साहित्य आहे. यामध्ये नवरसांचा परिपोष होत असला तरी प्रामुख्याने शांतरस हा त्यातील प्रधानरस आहे.‌ ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी संत मुक्ताबाई यांचे ‘ताटीचे अभंग’ अतिशय उपयुक्त आहेत. संतसाहित्य हे बहुतांशी संवाद स्वरूपात असल्याने माणूस त्याच्याशी लगेच तादात्म्य पावतो!” अतिशय रसाळ वाणी अन् प्रासादिक शैलीतून केलेल्या निरूपणामुळे उपस्थितांना भक्तिरसात चिंब भिजून टाकले.

रामदास जैद यांनी अध्यक्षीय मनोगतातून निर्मल वारी, हरित वारी या प्रयोगांची माहिती देताना, “ज्ञानेश्वरी हा फक्त चिंतनाचा विषय नसून तो अनुकरणाचाही विषय आहे!” असे मत व्यक्त केले. प्रा.दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सीमा काळभोर यांनी आभार मानले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles