Friday, November 22, 2024
HomeआंबेगावHirda : हिरडा प्रश्नावर सुरू असलेले उपोषण स्थगित पण आंदोलन सुरूच

Hirda : हिरडा प्रश्नावर सुरू असलेले उपोषण स्थगित पण आंदोलन सुरूच

मंचर : निसर्ग चक्रीवादळात जून २०२० साली जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून किसान सभेच्या नेतृत्वाखाली मागील साडेतीन वर्षे आंदोलन व या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे. नुकतेच, दि.१५ फेब्रुवारी पासून उपविभागीय कार्यालय मंचर येथे किसान सभेच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू आहे. The ongoing hunger strike over the Hirda issue has been called off but the agitation continues

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत गावपातळीवर विविध आंदोलने सुरू केली आहेत. शेकडो विद्यार्थ्यांनी घोडेगाव ते मंचर असे १५ किमी पायी चालत या आंदोलनाला पाठिंबा दिला.

The ongoing hunger strike over the Hirda issue has been called off but the agitation continues

या सर्व आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनी शिवनेरीवर शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी हिरडा नुकसान भरपाई देवू अशी घोषणा केली व उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावे असे आवाहनही केले.

दि.२० फेब्रुवारी रोजी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दि.२५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होईल असे आश्वासित करून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही उपोषणकर्त्यांशी फोनवर संवाद साधून उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले होते.

दि.२० फेब्रुवारी रोजी किसान सभेचे शिष्टमंडळ ज्यामध्ये कॉम्रेड अजित अभ्यंकर, राजू घोडे, विश्वनाथ निगळे सहभागी होते. यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. यावेळी अनिल पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले व हा प्रश्न या कॅबिनेटमध्ये नक्की मार्गी लागेल असे आश्वासित केले.

या सर्व पार्श्वभूमीवर किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीने,दि. २१ फेब्रुवारी रोजी, सकाळी अकरा वाजता मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परंतु मंत्रिमंडळात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपविभागीय कार्यालय मंचर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहील असा निर्धार केलेला आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार रोहित पवार, माकपचे नेते अजित अभ्यंकर, गणेश दराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत पाटणकर, कारखान्याचे संचालक देवदत्त निकम व विविध राजकीय सामाजिक-संस्था संघटनेचे प्रतिनिधी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला. या सर्वांचे किसान सभेने आभार व्यक्त केले‌. ‌‌

तसेच प्रांत कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस प्रशासन, उपजिल्हा रुग्णालय मंचरमधील वैद्यकीय अधिकारी, पत्रकार मित्र या सर्वांचे किसान सभा आभार व्यक्त केले. दि.२५ तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरडा नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील. या धरणे आंदोलनाला सर्व शेतकरी बांधव भरभरून साथ देतील असा किसान सभेला विश्वास आहे.

दि. २५ तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरडा नुकसान भरपाईचा निर्णय न झाल्यास किसान सभा पुढील काळात तीव्र आंदोलन करेल असा इशारा किसान सभेचे अँड. नाथा शिंगाडे, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, राजू घोडे, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे, रामदास लोहोकरे, आमोद गरुड, कृष्णा वडेकर, विकास भाईक, महेंद्र थोरात, संतोष कांबळे, दत्तू बर्डे, कमल बांबळे, दत्ता गिरंगे, अशोक जोशी, भिमाबाई लोहकरे, नारायण वायाळ, डॉ.मंगेश मांडवे यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय