संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर प्रतिनिधित्व द्यावे-नंदकुमार हात्तीकर
सांगली:होलार ही महाराष्ट्रातील एक स्वतंत्र ओळख असलेली जात आहे. गावागाड्याच्या बलुतेदार व्यवस्थेमध्ये जुन्या चपला शिवणे तसेच विवाह,यात्रा,मंदिरामध्ये वाजंत्री व इतर चर्म वाद्य वाजवून उदरनिर्वाह करणे हाच मुख्य व्यवसाय होता.महाराष्ट्रात एकूण ५९ अनुसूचित जातींपैकी होलार एक जात SC-२६ नंबरची ही जात आहे.

चांभार,मोची,धोर आणि होलार या समाजासाठी २००३ साली संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ स्थापन करून समाजाच्या उन्नतीसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत.मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात होलार समाजाला महामंडळावर प्रतिनिधित्व नाही.त्यामुळे विविध समस्या शासनदरबारी मांडता येत नाही,त्यासाठी मंडळावर समाजाला प्रतिनिधित्व द्यावे,अशी मागणी होलार समाजाचे सांगली येथील नेते व होलार समाज विकास प्रतिष्ठानचे सचिव नंदकुमार हात्तीकर यांनी एका निवेदनाद्वारे मंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे.

प्रतिष्ठानचे नंदकुमार हात्तीकर,भिकाजी गुळीग,महादेव पारसे,ऍड.निषाद जावीर यांनी महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यलयास निवेदन पाठवून म्हटले आहे की,महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येच्या होलार समाज बांधवांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी समाजाला महामंडळावर प्रतिनिधित्व देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत अशी विनंती केली आहे.