Wednesday, February 5, 2025

आदिवासी कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा – एस.एफ.आय.ची मागणी

घोडेगाव (दि.०६) : नेमावर जि. देवास (मध्य प्रदेश) येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या व परिवारातील ५ सदस्यांचा खून करणाऱ्या सामूहिक हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंद्र चौहान व इतरांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) पुणे जिल्हा समितीने भारताचे राष्ट्रपती, मध्यप्रदेशचे राज्यपाल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या संबंधीचे निवेदन घोडेगाव तहसीलदारांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश राज्यातील देवास जिल्ह्याच्या नेमावर या गावात गावातीलच भाजपचा हुकूमशहा स्थानिक नेता, नराधम वृत्तीचा सुरेंद्र चौहान व त्याच्या अन्य साथिदारांनी आदिवासी समाजातील एकाच परिवारातील ५ सदस्यांचा निर्घृण खून करून सामुहिक हत्याकांड घडवून आणले. खूनी, नराधम भामटा सुरेंद्र चौहान याने आदिवासी समाजातील मुलींवरील प्रेम प्रकरणातून मुलीसह अन्य अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या आईसह लहान बालक असे मिळून ५  सदस्यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला. आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने स्वत:च्याच शेतात १० फूटाचे खड्डे करून, सर्व प्रेतांची विल्हेवाट लावली. आणि प्रेते लवकर कुजावित म्हणून युरीया खताचा वापर केला. तब्बल दीड महिन्यानंतर सदर घटना ऊघडकिस आली. या घटनेने संपूर्ण देशाची मान शरमेने झुकली आहे . मानवतेला काळीमा फासणाऱ्या या नराधम, बदमाशांवर कठोर कारवाई करावी . जेणेकरून अशा अमानवी, क्रूर घटनांना पायबंद बसेल. 

देशात मागास आदिवासी समाजावर दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचार, अन्याय, खून यांसारखे अमानवी प्रकार वाढतच आहेत. तसेच मध्यप्रदेश राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून अनेक अत्याचाराच्या घटना  घडल्या आहेत. या घटनांनी पोलीस प्रशासन आणि संबध न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एस.एफ.आय. आंबेगाव तालुका या मध्यप्रदेश पोलीस प्रशासना जाहीर निषेध करते.

देशात सर्वांना समान न्याय या तत्वावर आदिवासी मुलींना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रैक कोर्टात चालून नराधम, खूनी, बलात्कारी सुरेंद्र चौहानसह त्याला मदत करणाऱ्या इतरांवर  लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी एस.एफ.आय. आंबेगाव तालुका समिती करत आहे. अन्यथा एस.एफ.आय.आंबेगाव तालुका समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात येतील.

वरील आशयाचे निवेदन घोडेगाव तहसील कार्यलयाचे निवासी नायब तहसीलदार एस.बी.गवारी यांच्याकडे देण्यात आले. यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा सहसचिव बाळकृष्ण गवारी, आंबेगाव तालुका समिती सचिव समीर गारे उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles