नागपूर : चना कटाईसाठी आलेल्या महिला मजूर परतीच्या वाटेला असताना त्यांना घेऊन जाणारी टाटा सुमो गाडी अनियंत्रित होऊन उलटली. यात तिघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालकासह १३ महिला जखमी झाल्या आहेत.गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्सी चौकी हद्दीतील सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागळे तिघीही रा. खरबी (माहेर) ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर अशी मृत महिलांची नावे आहेत. सध्या उमरेड-भिवापूर तालुक्यात चणे कटाईचे काम सुरू आहे. मजुरांच्या आभावामुळे बाहेर जिल्ह्यातील मजुरांची स्थानिक शेतकरी रोज ने-आण करीत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी रोज शंभर ते दोनशे किलोमीरचा जीव घेणा प्रवास हे मजूर करतात.
अशातच गुरुवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी (माहेर) जि. चंद्रपूर येथून चना कटाईसाठी वायगाव (गोंड) ता. उमरेड येथील शुभम राऊत यांच्या शेतात एम. एच.३३-ए-१९४७ टाटा सुमो गाडीमध्ये चालक पकडून एकूण १७ महिला मजूर आल्या होत्या. सायंकाळी काम आटोपल्यानंतर महिला मजूरांना घेऊन खरबी (माहेर) येथे परत जाताना सालेभट्टी गावाजवळील वळण मार्गांवर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी होऊन रस्त्या शेजारच्या झाडावर आदळली. त्यात गाडीतील रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागळे यांचा जागीच मृत्यू झाला तर तन्वी विनोद मेश्राम (१९), दुर्गा विजय आडकिने, संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत आडकिने, सोनाबाई सिंधू दुके, संध्या संतोष बाळगे, सरिता विजय नागपुरे, मनोरमा शांताराम मेश्राम, सावित्री बिसन आडकीणे, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अर्जुन बागडे व वाहनचालक शंकर मसराम हे जखमी झाले.
अपघात झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना प्राथमिक उपचारासाठी सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच चंद्रपूर जि.प.चे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनीही घटनास्थळी दाखल होत महिलांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सदर अपघाताची नोंद बेला पोलिसांनी घेतली आहे. अपघाताचा तपास उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, बेला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव बाडगीरकर, कुणाल ठाकूर, बाबा नेवारे करीत आहेत.