एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीचे आवाहन
मुंबई, दि. १६ : १७ जून रोजी महागाई आणि आरोग्याच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( एसएफआय ) महाराष्ट्र राज्य कमिटी चे अध्यक्ष बालाजी कलेटवाड व सचिव रोहिदास जाधव यांनी केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मागील एका वर्षांपासून कोरोनाने देशभरातील जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत सरकारने आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत निंदनीय आणि अमानवीय आहे. कोरोना महामारीत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले. खाजगी दवाखान्यांनी लोकांना प्रचंड लुटले. या लुटीला थांबविण्यात सरकार सपशेल फेल झाले.
आणि अशातच महागाई गगनाला छेदून पार गेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, गोडतेल, आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे.
म्हणून १७ जून रोजी महागाई आणि आरोग्याच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करण्याची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी महागाई व आरोग्याच्या प्रश्नासाठी आणि आपल्या शैक्षणिक मागण्यांना घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.