किसान सभा करणार शेतकरी धोरणांचा निषेध !
जुन्नर, दि. १६ : शेतकरी प्रश्नांंना घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. जुन्नर तालुक्यातही उद्या दिनांक 17 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता किसान सभेच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी दिली आहे.
आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
1. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा, आगामी काळात अशा प्रकारची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा कायदा करा, दूध व्यवसायाला साखर धंद्याप्रमाणे रेव्हेन्यू शेअरींग व किमान हमी दर असे दुहेरी संरक्षण लागू करा,
2. खरीप हंगामाच्या तयारीसाठी राज्यभर सर्वत्र पुरेसे खत, दर्जेदार बियाणे, शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या.
3. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी विमा योजनेची सक्षम व पारदर्शक अंमलबजावणी करा.
4. लॉकडाऊनच्या काळात थकलेली वीजबिले विनाशर्त माफ करा.
5. आदिवासी शेतकऱ्यांना खावटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला, मात्र अद्यापही राज्यभरातील लाखो आदिवासी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही, ते अनुदान सर्व श्रमिक आदिवासींना तातडीने द्या.
6. वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वत्र चालना द्या.
7. वृद्ध, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता, यांना लॉकडाउन काळात अतिरिक्त 1 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती या घोषणेची अंमलबजावणी करा व या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान किमान 3 हजार रुपयांपर्यंत वाढवा.
8. कोविड महामारीचे संकट अद्यापही संपलेले नसल्याने, सर्वत्र पुरेशा आरोग्य व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत उपलब्ध करा आणि सर्वांचे मोफत व त्वरित लसीकरण करा.
8. पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे मागील वर्षभर पंचनामे होऊनही बाळहिरडा नुकसान भरपाई मिळाली नाही ती त्वरित मिळावी.