पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेतल्या जाणाऱ्या एलएलबी तीन वर्षे आणि पाच वर्षे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आमरण उपोषण सुरू केले आहे. 8.3.2023 पासूनच्या एलएलबी व बीए एलएलबी च्या शैक्षणिक वर्ष 2022- 2023 च्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षा किमान एक महिना तरी पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेतल्या जाणाऱ्या एलएलबी तीन वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022 ते 2023 च्या तिसऱ्या सत्र परीक्षा 8-3-2023 पासून घेतल्या जाणार आहेत. परंतु सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश संबंधित विधी महाविद्यालयात दिनांक 16.12.2022 रोजी व महाविद्यालय स्थानांतर करून घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश 14.1.2023 रोजी झाले आहेत. म्हणजे सर्वसाधारण सुट्टीचे दिवस वगळत असता प्रवेश दिनांक 16.12. 2022 ते परीक्षा दिनांक 8.3.2023 पर्यंत फक्त 70 दिवस भरतात. ते सुद्धा स्थानांतर न झालेल्या विद्यार्थ्यांचे. अभ्यासक्रमाचा विचार केला असता विद्यार्थ्यांना पाच विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे.
तसेच अभ्यासक्रम पूर्ण करणे हे 70 दिवसात कोणत्याही परिस्थितीत अशक्य आहे. नियमानुसार ऍडमिशनच्या कालावधीपासून ते परीक्षेच्या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांना मुबलक वेळ म्हणजेच कमीत कमी 90 दिवस अभ्यासासाठी मिळणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पाच इंटरनल असाइनमेंट, पाच क्लास टेस्ट, परीक्षा यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेची तयारी करणे हे 70 दिवसांत शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
8.3.2023 पासूनच्या एलएलबी व बीए एलएलबी च्या शैक्षणिक वर्ष 2022- 2023 च्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षा किमान एक महिना तरी पुढे ढकलण्यात याव्यात, यासाठी 1-3-2022 पासून विधी महाविद्यालयाचा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.