हणबरवाडी (कोल्हापूर): “चार्वाक, बळी वंशातील राजे, बौद्ध भिक्षू, बसवन्ना, चक्रधर स्वामी, संत तुकारामांच्या सारखे अनेक वारकरी संत, महात्मा गांधी आणि अलीकडे शहीद डॉक्टर दाभोळकर, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, अशा महामानवांचे सनातन्यानी खून पाडले. माणसे संपली पण विचार संपवता आले नाहीत”, असे प्रतिपादन अनिल चव्हाण यांनी केले.
जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेत, अंधश्रद्धा निर्मूलन, या विषयावर ते बोलत होते. प्रास्ताविकात विक्रांत सरांनी धर्मद्रोही आणि समाजद्रोही सनातनी विचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत – मुलांची अधिकार व कर्तव्य; कला; व्यक्तिमत्व विकास; किशोरावस्थेतील मार्गदर्शन; करिअर मार्गदर्शन इत्यादी विषयावर अनुराधा भोसले, वर्षा तेंडुलकर, आर. वाय. पाटील, शरद गायकवाड, अर्चना जगतकर, उर्मिला चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता, “आम्ही प्रकाश बीजे उधळीत चाललो ….” या गीताने झाली. ८ दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत दीडशे विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षण कार्यशाळेसाठी विक्रांत जाधव, शाहरूख आटपाडे, जयश्री कांबळे, कौशल्या आंग्रे, वनिता कांबळे, अविनाश शिंदे, अन्नपूर्णा कोगले आदींनी परिश्रम घेतले.