पुणे : ३ जानेवारी २०२१ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी आयोजित कार्यक्रम वनिता फाळके यांच्या पुढाकाराने पुण्यातील एस. एम. जोशी सोशालिस्ट फउंडेशन येथे ‘सावित्र उत्सव’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन शाळेच्या पाटीवर आमंत्रित सर्व महिला आणि पुरुष यांनी एकेक अक्षर गिरवून करण्यात आली. भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंच्या वारशाचा जागर करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिस दुसाने आणि माही थोरात या बालकलाकारांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनात मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करण्याचा दृढनिश्चय कसा केला. त्याबद्दल दोघांच्या संवादातून छोटं नाट्य-रूपांतरण सादर केलं.
प्रणिता वारे आणि रेश्मा खाडे यांच्या प्रयत्नातून पुढे आलेल्या ‘सावित्री वदते’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्यानंतर पहिल्या महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सुनीता जाधव, तृप्ती जाधव, अरुणा यशवंते आणि रोहिणी जाधव यांचा सत्कार सावित्रीबाई फुलेंच्या चरित्रावरील ही पुस्तिका भेट देऊन करण्यात आला.
सावित्रीबाई यांनी ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रातून त्यांचा क्रांतिकारी विचार कसा फुलत गेला याचा अनुभव या पत्रांच्या ऍड. परिक्रमा खोत यांनी केलेल्या अभिवाचनातून आला. या कार्यक्रमात माधुरी आवटे, कृतार्थ शेवगावकर, श्रुती, राम, डॉ. नितीन हांडे, अर्चना, मेघना हांडे, प्रिया दुसाने यांनी सावित्रीबाई यांचा विचार पोचवणारा विविध प्रबोधनपर गीते सादर केली.
डॉ. आरजू यांनी फातिमा शेख यांचा मोलाचा सहभाग व शिक्षण देण्यात मोलाचे योगदान होते हे स्पष्ट केले. दीप्ती जाधव यांनी आधुनिक आणि पुरोगामी महिला हक्क व कर्तव्ये या प्रकाश टाकला. रोहिणी जाधव आणि क्रांती दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या नियोजनात कृतार्थ, प्रतीक, ऍड. मनीषा महाजन, अक्षय दावडीकर, भानू दुसाने, राहुल माने , सदाशिव फाळके यांनी सहाय्य केले.