Friday, March 14, 2025

देवळे गावातील आरोग्य उपकेंद्राची दुरावस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष.

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवाशी भागातील देवळे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची दुरावस्था झालेली आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते.

जुन्नर शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आहे. आरोग्याचं उपकेंद्र असून हि याकडे ना ग्रामपंचायतचे लक्ष आहे ना प्रशासनाचे. लॉकडाऊनच्या कालावधीत सुद्धा दवाखाना बंद असल्याचे दिसत आहे. येथील डॉक्टर आठवड्यातून एक दोन दिवस येतात, गंभीर आजारावर कोणत्याच प्रकारचे उपचार येथे केले जात नाहीत. आरोग्याचं हे उपकेंद्र फक्त नावालाच आहे. 

गोळ्या, औषधे सोडली तर येथे आजारांंवर उपचार उपलब्ध नाही. पुरेसे कर्मचारी नाहीत. २४ तास आरोग्य सेवा मिळत नसून आरोग्य केंद्र शौचालयाचे ठिकाण बनवले आहे.

 

दवाखान्याच्या अवती भोवती छोटी मोठी झाडे झुडपे वाढलेली आहेत. दुर्गंधी युक्त गलिच्छ परिसर यामध्ये आरोग्य उपकेंद्र अशी दयनीय अवस्था झालेली आहे. काही महिन्या पूर्वी झालेल्या चक्री वादळाने दवाखान्याचे छप्पर उडून गेले आहे, त्याची पाहणी लोक प्रतिनिधी, अधिकारी करून गेले. परंतु त्याच्यावर अजून ही काही कार्यवाही झाली नाही, असे दिसते. 

आरोग्य ही माणसाची प्राथमिक गरज आहे. परंतु प्रशासन मात्र नेहमीच दुर्लक्ष करत आहे. लोक प्रतिनिधींच ही याकडे नेहमी दुर्लक्ष करत आल्याचे दिसते. आदिवासी बहुल हा भाग नेहमीच पायाभूत आणि मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. अगदी पिण्याचे पाण्यासाठी सुध्दा उन्हाळ्यात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी बहुल भागात दवाखान्यात जायचे म्हटले तर जुन्नर, मढ, आपटाळे, शिवाय पर्याय नाही. उपकेंद्र असूनही त्यांची अशी दयनीय अवस्था आहे. जर रात्री-अपरात्री कोणी आजारी झाले तर गाडी करुन नेण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थिती ग्रामीण आरोग्य उपकेंद्र मजबूत करुन नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करुन प्राथमिक उपचार उपलब्ध झाले तर नागरिकांचा इतरत्र जाण्याचा त्रास वाचेल. तसेच फिरती अँम्बुलन्स सेवा उपलब्ध झाले तर नागरिकांना सुविधा मिळतील. त्यामुळे सर्वच भागातील आरोग्य उपकेंद्रांचे बळकटीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles