नागरिकांना होतोय नाहक त्रास
पिंपरी चिंचवड, दि. ५ जूूून : पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे बांधण्यात आलेल्या घरकुल या गृहप्रकल्पातील पार्किंग, तळमजल्यावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. थोडा पाऊस पडला तरी पाण्याचे तळे तयार होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. शिवाय लिफ्टचा खालील भाग पाण्यात जातो. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आता तरी याकडे नगरसेवकांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लागावी, अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.
कारण मनपाच्या आदर्श अशा घरकुल वसाहतीमध्ये पहिल्याच पावसात सर्वत्र पाणी तुंबल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सोसायट्यांच्या शुद्ध पाण्याच्या टक्क्यांपर्यंत पावसाचे पाणी गेले आहे. सार्वजनिक रस्त्यावरुन हे पाणी तळमजल्यावर असलेल्या लिफ्टमध्ये शिरले. विद्युत पुरवठा खंडित झाला. गेली काही वर्षे या वसाहतीत ऐन पावसाळ्यात इमारतीचे छत गळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तुंबलेल्या पाण्याची समस्या असूनही येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी चिखली येथे गृहप्रकल्प उभारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय योजना (JNNURM) अंतर्गत EWS गटातील गरीब लोकांसाठी ही एक आदर्श वसाहत आहे. यात 6 हजार 720 सदनिका आहेत. यामध्ये 15 हजाराहून जास्त नागरिक येथे राहतात. परंतु, या नागरिकांना पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर येथील भाजीमंडई, मिनीमार्केट अद्यापही प्रलंबित आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी तुंबते.
चिखली येथील घरकुल वसाहत थोड्या सखल भागामध्ये असल्याने पावसाळ्यात सोसाट्यांच्या तळमजल्यावर पाणी साचण्याची समस्या गेल्या सात वर्षांपासूनच आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही.