Wednesday, February 5, 2025

पिंपरी चिंचवड : जम्बो कोविड केअर सेंटर उभारणी करा – मारुती भापकर

पिंपरी-चिंचवड : शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून रुग्णांना खाटा मिळत नाहीत. त्यामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड रुग्णालयाच्या धर्तीवर मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर तीन हजार खाटांचे दोन जम्बो कोविड केअर सेंटर उभारणी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दररोज अडीच ते तीन हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.

शहरातील महापालिका रुग्णालय व खासगी रुग्णालय हाऊसफुल आहेत. महापालिका रुग्णालय व खाजगी रुग्णालयात आयसीयु, ऑक्सिजन बेड, व्हेटिलेटर बेड अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. शहरात नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. पुढील परिस्थिती अत्यंत भयंकर व काळजात धडकी भरवणारी आहे.

महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पीएमआरडीए, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियम या ठिकाणी आयसीयु, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर बेड युक्त 816 खाटांचे रुग्णालय युद्धपातळीवर पंधरा दिवसात उभे केले.

त्याच धर्तीवर मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र या ठिकाणी 2000 खाटांचे तर सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर 1000 खाटांचे असे 3000 खाटांचे आयसीयु, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड युक्त सुसज्ज रुग्णालय युद्धपातळीवर काम करून पंधरा दिवसात उभे करावेत.

या पंधरा दिवसात डॉक्टर्स,कर्मचारी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आदि प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करण्याची तयारी करावी. यासाठी लागणारी ऑक्सिजन, यंत्रसामुग्री, औषधे, रेमडेसिव्हर इंजेक्शन जमा करावेत, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles