थेरगाव येथील अन्यायग्रस्त कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – आमच्या तक्रारींचे निवारण करा. आम्हाला लवकर न्याय द्या. न्याय देऊन तुमच्या लाडक्या बहिणीला मानापानाने घरी जाण्याची व्यवस्था करा, असे साकडे पिंपरी चिंचवड मधील थेरगाव येथील अन्यायग्रस्त चव्हाण कुटुंबियांनी घातले आहे. पाण्यापासून वंचित ठेवत जातीवाचक शिविगाळ प्रकरणी न्याय मिळावा म्हणून थेरगाव येथील रेश्मा चव्हाण आपल्या दोन मुले आणि बहिणीसह मुंबईपर्यंत चालत गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी हे कुटुंब मुंबईत पोचले आहे. (PCMC)
कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन विचारपूस केली.या वेळी बाबा कांबळे यांच्या आवाहनानंतर चव्हाण यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. सावकारी पाश वाढल्याने रिक्षा चालक आणि एका कुटुंबियाने आत्महत्या केली. त्यांना न्याय देऊन थेरगाव येथील कुटुंबाला देखील न्याय देण्याची मागणी बाबा कांबळे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली. दरम्यान पिंपरी ते मुंबई १३४ किलोमीटर पेक्षा अधिकचे अंतर दोन लहान मुलांसोबत चालत जाणाऱ्या कुटुंबियांची बाबा कांबळे यांनी मुंबई येथे भेट घेतली. त्यांची विचारपूस करत यावर मार्ग काढण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना बाबा कांबळे यांनी केले. (PCMC)
या बाबत बाबा कांबळे म्हणाले की, लहान लेकरांना घेऊन न्याय मागण्यासाठी संबंधीत कुटुंबियांना मुंबईपर्यंत चालत यावे लागत असेल तर हे दुर्देव आहे. मुलांची अवस्था बिकट झाली आहे. या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने दखल घेणे अपेक्षित होते. मात्र पोलिस आपले काम करत नाहीत, हा आरोप मी केला होता. तो या कुटुंबियांच्या आंदोलनाने सिद्ध झाला असल्याचे हे चित्र आहे. या कुटुंबियांना आझाद मैदानावर देखील आंदोलन करू दिले नाही. त्यामुळे सध्या हे मुंबई रेल्वे स्टेशनवर थांबले आहेत. न्याय मिळाला नाही तर ते दिल्लीला चालत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्याय मागणार असल्याचे सांगत आहेत.
या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी त्वरीत त्या कुटुंबाला भेट देऊन न्याय द्यावा. यांना दिल्लीला जाण्याची वेळ येऊ देऊ नये, या बाबत खबरदारी घ्यावी. अन्यथा आम्ही देखील संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू, अशाच प्रकारच्या असंख्य घटना पिंपरी चिंचवड शहरांमध्ये घडत आहेत या सर्व प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी व या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून बाबा कांबळे यांनी आत्मक्लेश सत्याग्रह करून उपोषण करण्याचे जाहीर केले आहे,असे बाबा कांबळे म्हणाले.
PCMC : कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी मुंबईत घेतली दलित पिडित कुटूंबाची भेट
- Advertisement -