पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रावेत प्रकल्पातील ९३४ सदनिकांकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने सोडत काढली होती. परंतु महानगरपालिकेकडून रावेत येथील प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मात्र आता रावेत प्रकल्पातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत प्राप्त होणाऱ्या किवळे येथील सदनिका देण्याचे नियोजन आहे. या एका सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ रुपये असून या दरामध्ये ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यावयचा आहे, त्या लाभार्थ्यांनी संमतीपत्र महानगरपालिकेकडे १५ मार्च २०२५ पर्यंत सादर करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. (PCMC)
किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ७५५ सदनिका उभारण्यात येत आहेत. या सदनिका आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रावेत प्रकल्पातील निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या ७५५ सदनिकांपैकी ३७८ सदनिका सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना, २२६ सदनिका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांना, ९८ सदनिका अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना, ५३ सदनिका अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. एकूण ७५५ सदनिकांपैकी ३८ सदनिका या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत.
रावेत प्रकल्पातील लाभार्थी हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणानुसार संमतीपत्र देऊन या सदनिकांचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाकडे संमतीपत्र सादर करावे. या संमतीपत्राचा मसुदा लाभार्थ्यांनी चिंचवडगांव येथील चाफेकर चौकात असणाऱ्या उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयातून घ्यावा, व आवश्यक माहिती भरून सादर करावा. लाभार्थ्यांना सदनिकांचा लाभ घेताना संमतीपत्रासोबत आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निकष पुर्तता करणाऱ्या अर्जदारांनाच किवळे प्रकल्पातील सदनिका वाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय सदनिका हस्तांतरणाबाबतची प्रक्रियेमध्ये बदल करणे, या प्रक्रियेला स्थगिती देणे अथवा रद्द करण्याचे अधिकार महानगरपालिकेने राखून ठेवले आहेत. (PCMC)
PMAY PCMC
संमतीपत्रासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे
– आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक उत्पन्न तीन लाख पर्यंतचा उत्पन्न दाखला (तहसीलदार पिंपरी चिंचवड / हवेली / मुळशी यांचे स्वाक्षरीने किंवा १ वर्षाचा आयकर परतावा किंवा फॉर्म १६/१६अ)
– अर्जदाराचे जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय). अर्जदाराच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
– अर्जदाराचे जात वैधता प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)
– अर्जदार व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड (पिंपरी चिंचवड शहरातील)
– अर्जदार व सह अर्जदार यांचे पॅनकार्ड
– अर्जदाराचे बँक पासबुक छायांकीत प्रत, पासबुक खाते तपशिल पृष्ठ, रद्द केलेला धनादेश
– अर्जदाराचे मतदान ओळखपत्र (पिंपरी चिंचवड शहरातील)
– भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी – किमान र.रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
– संमतीपत्र ( पिंपरी चिंचवड शहरातील नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान र.रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र)
– वीज बिल (चालु महिन्याचे राहत्या पत्त्यावरील) – पिंपरी चिंचवड शहरातील
– अधिवास प्रमाणपत्र (फक्त महाराष्ट्रातील रहिवासी)
– दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या ७५५ सदनिका महानगरपालिकेकडे उपलब्ध होणार आहेत. या सदनिका आता रद्द झालेल्या रावेत प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन असून एका सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ रुपये इतकी आहे. ज्या लाभार्थ्यांना या दरामध्ये लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी संमतीपत्र सादर केल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार वितरण करण्याचे नियोजन आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
PCMC : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रावेत प्रकल्पातील विजेत्या लाभार्थ्यांना मिळणार किवळे येथे सदनिका; ७५५ सदनिकांचे हस्तांतरण करणार
- Advertisement -