महापालिकेवर हजारोंचा धडक मोर्चा अनधिकृत दुबार पुनर्वसन प्रकल्पाला तीव्र विरोध (PCMC)
पिंपरी चिंचवड –निगडी सेक्टर २२ महानगरपालिकेवर धडक मोर्चा बाबत महत्वाची सूचना आज दि. 8 एप्रिल रोजी सेक्टर नं.22, ओटास्किम, निगडी येथील 1563 बैठी घरे अनधिकृत दुबार पुनर्वसनास विरोधा संदर्भात महत्त्वाच्या मागणी करिता आणि SRA मार्फत अनधिकृत दुबार पुनर्वसन रद्दबातल ठरवावे या मागणीकरिता महानगपालिकेवर 1563 घरे धारक नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात आला. (PCMC)

प्रकल्पाच्या विरोधात आज हजारोंच्या संख्येने संतप्त नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. आमची झोपडपट्टी नाही, आमचं पुनर्वसन आधीच झालंय” असा स्पष्ट संदेश उपस्थित नागरिकांनी दिला व महापालिका आणि SRA प्राधिकरणाच्या संयुक्त कारस्थानाचा तीव्र निषेध केला.
सेक्टर क्र. 22 ओटास्किम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील संजयनगर, मिलिंदनगर, बौद्धनगर, विलासनगर, राजनगर, इंदिरानगर, येथून हजारो महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक महापुरुषांच्या प्रतिमा, फलक, बॅनर आणि घोषणांनी दानानून महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर एकवटले.
वास्तविक वसाहतीतील १५६३ बैठेओठा धारकांचे पुनर्वसन महापालिकेने १ मे १९८९ पूर्वीच पूर्ण केले आहे. पक्की घरे, पाणी, गटार, विज, रस्ते यांसारख्या सर्व नागरी सुविधा आहेत. तरीही महापालिकेने या वसाहतीला गलिच्छ झोपडपट्टी घोषित करून SRA प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
SRA प्रकल्पाच्या प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार घडल्याचा आरोपही नागरिकांनी केला. (PCMC)
स्थानिक पुढारी, SRA अधिकारी आणि विकसक यांच्यात संगनमताने नागरिकांकडून दिशाभूल करून खोटी सहमती घेण्यात आली. त्यातूनच संजयनगर भागाची अंतिम नोटीस SRA ने जाहीर केली. त्यात नागरिकांच्या गरीबी आणि अज्ञानाचा फायदा प्रशासन घेत असल्याचा आरोप करण्यात आला.
लोकांच्या नावाने परस्पर फॉर्म भरून सबमिट करण्यात आले असून, पुनर्वसनाची गरज नसतानाही त्यांना झोपडपट्टी दाखवून फसवण्यात आलं आहे. या सर्व प्रकारांबाबत तक्रारी असूनही SRA चे कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही, उलट प्रकल्प गुपचूप पुढे रेटला, ही बाब संशयास्पद असल्याचा संताप कार्यकर्त्यांनी केला. (PCMC)
मोर्चानंतर नागरिकांचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांची भेट घेऊन खालील मुख्य मागण्या सादर केल्या
महापालिकेने आधीच केलेल्या पुनर्वसनाची अधिकृत माहिती SRA ला द्यावी, सद्यःस्थितीत सुरू असलेले SRA प्रकल्प स्थगित करावेत, नागरिकांकडून घेतलेल्या खोट्या सहमतीची चौकशी व्हावी आणि नव्याने निष्पक्ष फेरसर्वेक्षण करून खऱ्या सहमतीची पडताळणी व्हावी.
आयुक्तांनी मागण्या ऐकून घेतल्या असून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र मागील अनुभव पाहता शिष्टमंडळाने केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता पुढील संघर्षासाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला. “जर आमचं पुनर्वसन आधीच झालं असेल, तर आमचं दुसऱ्यांदा पुनर्वसन कशासाठी?” असा थेट सवाल आंदोलकांनी केला.
मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध, लोकशाही आणि संविधाननिष्ठ पद्धतीने पार पडला. आंदोलनाचा स्वरूप जरी शांत होता, तरी त्यामागचा रोष स्पष्ट जाणवत होता.

यावेळी सदर मोर्चाचे आयोजन 1563 बैठी घरे सेक्टर क्र.22 कृती समिती च्या वतीने करण्यात आले यावेळी 1563 घरांमधील हजारो नागरिक आणि समितीचे अध्यक्ष – प्रशांत नाटेकर, कार्याध्यक्ष – शिवाजी साळवे, सरचिटणीस – ॲड. संतोष शिंदे, उपाध्यक्ष – सचिन उदागे, अरुण जोगदंड, सुलतान तांबोळी, बसुराज नाटेकर, प्रमोद क्षिरसागर, मारुती भापकर, अक्षय करंडे, रमेश गायकवाड, राहुल बनसोडे, उमाकांत गायकवाड, सनी पवार, गौतम पटेकर, सनमुख हादिमणी, शिवशरण हिपरीकर, बुद्धभूषण अहिरे, मयूर साळवे, सागर सूर्यवंशी, विशाल मांजरे,अनिल साळवे, भाऊसाहेब अडले, माजी नगरसेवक – सचिन चिखले, तानाजी खाडे, बापु घोलप, उत्तम केंदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.