पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी या विद्यालयामध्ये ‘माझी माती माझा देश’ अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. कार्यक्रमासाठी माजी सैनिक रघुनाथ सावंत,ज्योती गोफणे (महिला राष्ट्रवादी कार्याध्यक्षा, पिं.चिं.),आशा मराठे (महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा, पिं.चिं.) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून व विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे व ज्येष्ठ शिक्षिका मीना नाचोणकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व पाहुण्यांच्या सत्काराने झाली.

माजी सैनिक रघुनाथ सावंत यांनी विद्यार्थ्यांना देशाबद्दल पवित्र भावना, त्याग आणि देशभक्ती याबद्दल प्रेरणात्मक उद्बोधन केले. मा. ज्योतीताई गोफणे यांनी देखील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा समाजप्रबोधनात्मक उपक्रमांसाठी खंबीरपणे साथ देण्याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमादरम्यान ‘पंचप्राण शपथ’ विद्यार्थ्यांकडून वदवून घेण्यात आली. गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातीसाठी झटणाऱ्या आपल्या शूरवीरांचा सन्मान व्हावा हा या उपक्रमामागील हेतू होता.

या उपक्रमाबरोबरच विद्यालयातील विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅज सुपूर्त करण्यात आले. यामध्ये हेड गर्ल-अर्चीता ढोले, हेडबॉय-शुभम जाधव, स्पोर्ट्स कॅप्टन- समृद्धी मराठी, व्हाइस स्पोर्ट्स कॅप्टन- गौरी जाधव इ. विद्यार्थ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. नियुक्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मंदार देसाई यांनी विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.


