Tuesday, April 15, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : “कविता हा मनाचा हुंकार!” – ललिता श्रीपाल सबनीस

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: “कविता हा मनाचा हुंकार असतो! संस्कृतीची अक्षरबद्ध संवेदना असलेली कविता मनामनाला जोडते!” असे विचार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री ललिता श्रीपाल सबनीस यांनी सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे रविवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी व्यक्त केले. काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काव्यजागर कविसंमेलन आणि सन्मान सोहळ्यात ललिता सबनीस बोलत होत्या. विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक व्यंकटराव वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच मराठवाडा जनविकास मंचचे संस्थापक – अध्यक्ष अरुण पवार, काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे, उपाध्यक्ष संजय साळुंखे, सचिव शामराव सरकाळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

---Advertisement---



याप्रसंगी श्रीकांत चौगुले, सागर वाघमारे आणि दादाभाऊ ओव्हाळ या साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अरुण पवार यांनी आपल्या मनोगतातून, “नवोदित कवींसाठी व्यासपीठ आणि प्रथितयश लेखकांचा उचित सन्मान हा काव्यात्मा या संस्थेचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे!” असे गौरवोद्गार काढले. सन्मानार्थींच्या वतीने श्रीकांत चौगुले यांनी, “स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ पांढरपेशीय असणारे साहित्य नंतरच्या काळात ग्रामीण, दलित, कष्टकरी कामगार वर्गापर्यंत पोहोचले. त्याचेच प्रत्यंतर पिंपरी – चिंचवड औद्योगिक नगरीत दिसते, त्यामुळेच साहित्य चळवळीत कामगारांचा सहभाग अधिक दिसतो!” असे मत मांडले. व्यंकटराव वाघमोडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “सूर्याची किरणे जिथे पोहचू शकत नाहीत; तिथे कविकल्पना पोहोचते. त्यामुळे कवींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून महापुरुषांच्या राष्ट्रविचारांचा प्रसार करावा!” असे आवाहन केले.

काव्यजागर कविसंमेलनात शोभा जोशी, प्रज्ञा दिवेकर, नंदकुमार मुरडे, प्रदीप गांधलीकर, अनिल नाटेकर, दत्तू ठोकळे, कैलास भैरट, विजय जाधव, उमेंद्र बिसेन, राहुल भोसले, जितेंद्र चौधरी, भगवान गायकवाड, सुनीता घोडके, किसन म्हसे, नितीन भोसले, अरुण घोडके यांच्यासह सुमारे चोवीस कवींनी मुक्तच्छंद, गीत, गझल, विडंबन अशा प्रकारातील वैविध्यपूर्ण आशयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि वृक्षाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. आत्माराम हारे यांनी प्रास्ताविक केले. भरत बारी यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles