हा पुरस्कार मिळवणारी भारतातील डॉ. वर्षा तुळसे एकमेव दंतरोग तज्ञ (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड मधील रहिवासी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदा तुळसे व लक्ष्मण तुळसे यांची कन्या डॉ. वर्षा तुळसे (खिराडे) या लंडन मधील ब्रूक लेन डेंटल सर्जरी, फेलिक्सस्टोव्हच्या संचालिका आहेत. यांना नुकताच डॉकलँड एक्सएल, लंडन येथे इंग्लंडचे मुख्य दंत अधिकारी जेसन वाँग यांच्या हस्ते ‘नॅस्डॅल डेंटल चेक बाय वन (DCby1) प्रॅक्टिस ऑफ द इयर २०२५’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. इंग्लंडमध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. वर्षा तूळसे या एकमेव भारतीय डॉक्टर आहेत. यावेळी एनएएसडीएएल चे प्रमुख हैदी मार्शल, बीएसपीडीचे अध्यक्ष शन्नू भाटिया, डॉ. किरण तुळसे, व्यवस्थापक चंद्रकांत खिराडे आदी उपस्थित होते. डॉ. वर्षा तुळसे यांना २०१७ मध्ये देखील इंग्लंड संसदेचे अध्यक्ष जॉन बर्को यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा ‘डेंटल टीचिंग पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. (PCMC)
हा राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी ब्रिटिश सोसायटी ऑफ पेडियाट्रिक डेंटिस्ट्री (बीएसपीडी) डेंटल चेक बाय वन या उपक्रमात सहभागी होणाऱ्या इंग्लंडमधील डॉक्टरांना देण्यात येतो. दोन वर्षापर्यंतच्या बाळांची दाताची निगा राखणे, मौखिक आरोग्य सुदृढ ठेवणे यासाठी सामाजिक जनजागृती करून उपक्रम राबविण्यात डॉ. वर्षा तुळसे यांचा नेहमी पुढाकार असतो. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून डॉ. वर्षा तुळसे या महिन्यातून एक दिवस लंडन येथून प्रसारित होणाऱ्या सफॉक साउंड (SUFFOLK SOUND) या टॉक शोमध्ये सहभाग घेऊन नागरिकांना दंत रोगाविषयी मार्गदर्शन करतात, या टॉक शोचे सूत्रसंचालन लंडनचे माजी महापौर मार्क जेप्सन (MARK JEPSON) हे करतात. याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. वर्षा तुळसे यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पिंपरी चिंचवड शहरातील जय हिंद हायस्कूल मध्ये तर वैद्यकीय शिक्षण नाशिक येथे झाले आहे. बीडीएस पदवीनंतर एक वर्ष त्यांनी पिंपरी मध्ये दंत रोग तज्ञ डॉ. मोहन पानसे यांच्याकडे प्रॅक्टिस केली. यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये एमजेडीएफ (आरसीएस) २००८; ओआरइ (जीडीसी युके) २००९; पीजी डेंटल एज्युकेशन (बेडफोर्डशायर, युएनआय) २०१७; पीजी रेस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्री (आरसीएस, इंग्लंड) २०१८ आणि डिप्लोमा इन डेंटल लॉ अँड एथिक्स (युनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशायर) २०२३ असे उच्च शिक्षण घेतले आहे. (PCMC)
डॉ. वर्षा तुळसे या मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड येथे कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी इंग्लंड मधील मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना डॉ. वर्षा तुळसे यांनी सांगितले की, हा पुरस्कार मिळाल्याने मी आणि माझी टीम खूप आनंदी आहोत. ब्रुक लेन डेंटल सर्जरीमध्ये आम्ही डेंटल चेक बाय वन या उपक्रमाविषयी आमची बांधिलकी ठेऊन दोन वर्षापर्यंतच्या बाळांसाठी आकर्षक पणे ‘टूथ फेयरी डे’ कार्यक्रमांतर्गत मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे व पालकांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतो. गेल्या वर्षापासून आम्ही चिल्ड्रन्स ओपन डेजची सुरुवात केली आहे, जिथे मुले मजेदार आणि आनंददायक पद्धतीने त्यांचे दात तपासू शकतात. आमचे सहयोगी कर्मचारी परिचा वेष परिधान करतात. यावेळी लहान बाळ न घाबरता आपले दात तपासून घेतात. त्यानंतर प्रत्येक बाळाला आकर्षक स्टिकर्स, टॅटू, रंगीत पत्रके आणि टूथब्रश भेट दिले जाते.
पालकांना बाळांच्या निरोगी दातांसाठी चांगल्या अन्नाची निवड करणे आणि नियमित दंत तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. लंडन येथील शाळेच्या सुट्ट्यांमध्ये वर्षाला असे किमान तीन कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे. डॉ. किरण तुळसे, चंद्रकांत खिराडे, ज्युली थोरोगूड, लिंडा प्लंब, हॉली फिशर, जेन हार्डी, हेलन स्विफ्ट, हरी खिराडे यांचे यासाठी नेहमी योगदान मिळते.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : पिंपरीची डॉक्टर कन्या वर्षा तुळसे यांचा इंग्लंडमध्ये ‘द प्रॅक्टिस ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरव
---Advertisement---
- Advertisement -