Wednesday, February 12, 2025

PCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : खेळ ज्याप्रमाणे खेळाडूंना शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना शिकवते त्याचप्रमाणे चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि आत्म- अभिव्यक्तींना प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्यांना वाव देण्यासाठी वेळोवेळी मंच उपलब्ध करून दिल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो, त्यातून उद्याचे कलाकार उदयास येतात, असे मत उपआयुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केले. (PCMC)

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने २ जानेवारी २०२५ रोजी निगडी येथील इंदिरा गांधी उद्यान (दुर्गादेवी टेकडी) येथे शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन उपआयुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, अरुण कडूस, अनिल जगताप, बाळाराम शिंदे, रंगराव कारंडे, बन्सी आटवे, दीपक जगताप, क्रीडा शिक्षक लक्ष्मण माने, प्रशांत उबाळे, सोपान खोसे, विजय लोंढे, राजेंद्र सोनवणे , सुभाष जावीर, अशोक शिंदे, खैरे भाऊसाहेब, पुनाजी पारधी, ऐश्वर्या साठे, वैशाली सांगळे, सुनीता पालवे, मंगल जाधव आदी उपस्थित होते.

शालेय चित्रकला स्पर्धेत एकूण १४७ शाळा मधून २०२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी माझा आवडता खेळ, झाडे लावा झाडे जगवा, भारतीय सण हे विषय देण्यात आले होते. तर आठवी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी रक्तदान श्रेष्ठ दान, प्रदूषण एक समस्या व त्यावरील उपाय, भारतीय संस्कृतीतील विविधता असे नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी विषय चित्रकलेसाठी देण्यात आले होते. (PCMC)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांच्या नियंत्रणाखाली तसेच स्पर्धा प्रमुख दीपक कन्हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन पंडित भीमसेन जोशी संगीत अकॅडमीच्या कला शिक्षकांनी सादर केलेल्या स्वागतगीत आणि ईशस्तवन गायनाने करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कन्हेरे यांनी तर सूत्रसंचालन हरिभाऊ साबळे, सुभाष जावीर यांनी केले. तसेच क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles