श्रध्दा युक्त अंतःकरणाने भगवंताची भक्ती करा,जशी भक्ती करू तसे फळ आपणास मिळते-ह.भ.प.संदीप महाराज पळसे
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:समाजात सामाजिक सलोखा वाढवा,लोकप्रबोधन व्हावे,स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच महाराष्ट्रातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला चालना मिळावी यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुलेनगर येथे वर्षभर विविध उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतात.
सेक्टर १८,महात्मा फुलेनगर,चिंचवड येथे गणेश जयंती सोहळा निमित्त १९ व्या वर्षी ‘अखंड हरिनाम सप्ताह’ व ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता बुधवारी करण्यात आली.या सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची हजेरी होती.
भगवान परमात्म्याची प्रेम ,श्रध्दा युक्त अंतःकरणाने भक्ती केली असता तो भगवान भक्तांसाठी लहान होतो,जशी भक्ती करू तसे फल आपणास देतो. – ह.भ.प. संदीप महाराज पळसे यांनी भाविकासमोर कीर्तन सादर करताना सांगितले.गेली आठ दिवस काकड आरती,ज्ञानेश्वरी पारायण,महिला भजन,प्रवचन,हरीपाठ,किर्तन व महाप्रसाद दैनंदिनी होता.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/02/IMG-20240215-WA0263-1024x683.jpg)
मंगळवारी श्री गणेश जन्मोत्सव निमित्त गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार यांच्या सहकार्याने श्री गायत्री गणेश याग (होमहवन) साजरा करण्यात आली व त्यानंतर ग्रंथ दिंडी मिरवणूक काढण्यात आली. नगरातील प्रत्येक घरासमोर रांगोळी घालून परिसर सजवले होते. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून दिंडींचे स्वागत केले. दिंडीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून व श्री क्षेत्र आळंदी येथून आलेल्या वारकरी,स्थानिक नागरिक व भाविक- भक्तानी पारंपारिक वेशभूषा करून भजन,सोंगी भारूड,फुगड्या,पावली सादर केली.त्यानंतर ह.भ.प. भरत महाराज थोरात यांचे कीर्तन झाले.
दरम्यान ह.भ.प.दयानंद महाराज पुरी,बबन महाराज खेकाळे,शांताराम महाराज पाटील,गणेश महाराज कार्ले,भागवत महाराज पानसरे, बबन महाराज शिंदे व भरत महाराज थोरात व यांचे किर्तने झाली.अनंत ब्रह्मांडे उदरी// हरी हा बालक नंदा घरी
या काल्याच्या अभांगाने उत्सवाची सांगता झाली. ह.भ.प. संदीप महाराज पळसे काल्याच्या कीर्तनानंतर गोपालकाला करून दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर गणेश मंदिराच्या प्रांगणात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते,सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी,महिला कार्यकर्ते व राजकीय लोकप्रतिनीधी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व पंचक्रोशीतील विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते व महिला भगिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.सचिव शिवानंद चौगुले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.