पिंपरी चिंचवड – सन 2025- 26 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये विकास कामांच्या केवळ मोठमोठ्या घोषणाचे केलेल्या दिसून येतात. जवळपास एक लाख कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी निधी कुठून उपलब्ध होणार, या संदर्भातले स्पष्टीकरण अर्थमंत्र्यांना देता आले नाही. (PCMC)
अनुसूचित जातींसाठी विकास योजनांमध्ये 42 टक्के वाढ केली आहे असे सांगत असताना, मागील पाच वर्षांमध्ये या योजनांचा 50 टक्के निधी कमी करण्यात आला होता हे नजरे आड करून केवळ धूळफेक करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. महायुती सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासन दिले होते परंतु त्या संदर्भात कुठलीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या दरमहा 1500 रुपये निधीमध्ये वाढ करून ती 2100 रुपये करण्यात येईल, असे सांगितले होते परंतु त्याबाबतीतही लाडक्या बहिणींची घोर निराशा झाली आहे.
दिव्यांग कल्याण निधीमध्ये पाच टक्के निधी राखून ठेवणे आवश्यक असताना केवळ एक टक्का निधी नियोजित करण्यात आला आहे, त्यामुळे दिव्यांगाप्रती असलेला सरकारचा उदासीन दृष्टिकोन समोर येतो. वाहनांवरील करांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केल्यामुळे वाहनांच्या किमती वाढतील, त्याचा विपरीत परिणाम उद्योगधंद्यांवर होण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार यांच्या सुरक्षेबद्दल कुठलीही योजना आणली गेली नाही. पायाभूत क्षेत्रात विकास कामांच्या ज्या योजना जाहीर केल्या त्या केंद्र सरकारच्या मदतीवर अवलंबून असल्यामुळे प्रत्यक्षात त्यांची किती अंमलबजावणी होईल याबद्दल शंका आहे. राज्यात सरकारी क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते, परंतु अर्थमंत्र्यांना या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही असे दिसते.
नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील दूषित पाणी त्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापरासाठी केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. मेट्रो रेल्वेसाठीच्या भरीव तरतुदी मध्ये केलेली वाढ ही एक दिलासादायक बाब आहे. राज्यात अनेक स्मारके आणि मंदिरांचा विकास करण्यावर अंदाजपत्रकात भर देण्यात आला असून सामान्य माणसाच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. (PCMC)
थोडक्यात, अजित दादा पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ असे त्याचे वर्णन करावे लागेल.
मानव कांबळे
अध्यक्ष- स्वराज अभियान महाराष्ट्र
PCMC : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प – बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी – मानव कांबळे
- Advertisement -