कोल्हापूर : ५ सप्टेंबर ऐवजी २८ नोव्हेंबर: महात्मा जोतीराव फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्र या संस्थेने केली आहे,तशा आशयाचे निवेदन मुख्य निमंत्रक सुनीलकुमार सरनाईक यांच्या हस्ते नायब तहसिलदार अनंत गुरव यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले हे या देशातील ज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणाचे महत्तम व आद्य पुरस्कर्ते होते.”न स्त्रि शुद्राय मतिम दध्यात” म्हणजे स्त्रिया व शुद्रातिशुद्रांना ज्ञानाचा अधिकार नाही असा पुकारा करणाऱ्या विषमतावादी छावणीला विरोध करत “विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले” असा समतावादी विद्यासंदेश म. फुले यांनी दिला. आधुनिक सत्यशोधक ज्ञानसंस्कृतीची पायाभरणी केली. सावित्रीबाई फुले व फातिमाबी शेख यांना सोबत घेऊन मुली व अस्पृश्यांच्या सह बहुजनांच्या साठी शाळा उघडल्या. मेंदूला गुलाम बनविणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा प्रथा यांना कृतिशील विरोध केला, शिवाय वैज्ञानिक सर्वंकश समतेच्या विचारांचा त्यांनी पुरस्कार केला. म्हणूनच राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.पंजाबराव देशमुख, क्रांतीसिंह नाना पाटील, यांसह अनेकांनी महात्मा जोतीराव फुलेंचा आदर्श घेतला. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. टि. एस. पाटील, महेश जाधव, राजू मालेकर, सर्जेराव चव्हाण, साथी हसन देसाई, चंद्रसेन जाधव, राजेश वरक, विजय भोगम, पी.आर.गवळी, सूरज गायकवाड, अशोक कांबळे, जयसिंग जाधव, साथी रवी जाधव, यशवंत सुतार आदी उपस्थित होते.