Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

वाढती महागाई व बेरोजगारीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

नांदेड : वाढती महागाई व बेरोजगारीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. दिनांक 14 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये माकप च्या आणि जन संघटनाच्या वतीने देशभर आंदोलने होणार आहेत. त्याचाच भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड शहर कमिटीच्या वतीने दिनांक 14 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

या निदर्शनेमध्ये प्रमुख मागण्यांमध्ये महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी परिणामकारक गॅस सिलेंडर वरील अनुदान पूर्ववत लागू करून त्याचे व सिलेंडरचे दर 50% कमी करावेत. रेशन व्यवस्था मोडीत काढणारी सरकारी मोहीम बंद करण्यात यावी. प्रतिवर्षी पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वांना स्वस्त धान्य रेशनवर देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह स्थानिक मागण्यांमध्ये मौजे वाघी ता.जि.नांदेड येथील मातंग समाजातील व्यक्ती शिवाजी खुणे हे मागील वीस दिवसांपासून बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून जलद गतीने तपास करावा व त्यांचा शोध घ्यावा. वाघे येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झेंडावंदन करण्यात येणाऱ्या जागेवर कलम 145 लावण्यात आले आहे, ते शिथील करावे. सीटू सलग्न संघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी गंगाधर खुणे यांना जातीय वाचक शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पो.स्टे.लिंबगाव येथे ॲट्रॉसिटी ची तक्रार दिली असता उलट त्यांच्यावर व त्यांच्या इतर सहा नातेवाईकांवर दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते रद्द करावेत.

लिंबगाव पोलिसांनी मातंग समाजाच्या दोन महिलांवर देखील दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत तसी चुकीची कारवाई करणाऱ्या लिंबगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व मातंग समाजातील व्यक्तींवर केलेली खोटी कारवाई मागे घेण्यात यावी. स्वारातीम विद्यापीठ नांदेड मध्ये माध्यम संकुलात शिक्षण घेणाऱ्या पवन जगडमवार व त्यांच्या बहिण व भावजी वर प्राण घातक हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्यामंदिर गांधीनगर नांदेड या शाळेच्या विरोधात अनेक आंदोलने झाली आहेत परंतु ठोस कारवाई झाली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील काही अधिकारी आमिषाला बळी पडून बोगस शिक्षण संस्था वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर व शाळेवर कठोर कारवाई करण्यात यावी.

नांदेड जिल्ह्यामध्ये दलित अत्याचार वाढत चालले असून ॲट्रॉसिटी ची तक्रार दिल्यास तक्रारदारावर दरोड्याचे किंवा इतर खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र नांदेड जिल्ह्यात चालू आहे ते तातडीने थांबविण्यात यावे. मौजे खुरगाव, चिखली, नांदुसा येथील महिलांनी रेशन कार्ड व घरकुलाची मागणी केली आहे, ती मागणी तात्काळ सोडविण्यात यावी. जिल्हा परिषदेसमोर दिनांक 28 जुलै पासून असंघटित कामगार संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून जिल्हा परिषद प्रशासन दखल घेण्यास तयार नाही त्या अनुषंगाने केलेल्या निवेदनातील मागण्या तातडीने सोडवाव्यात आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.

या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व कॉ.विजय गाभणे, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. लता गायकवाड,गयाबाई गायकवाड, धुरपत बाई खुणे, कौशल्याबाई दस्तके,रेवता दस्तके, सुशीलाबाई खुणे आदींनी केले आहे.

---Advertisement---
Lic Kanya Yojana
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles