पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली आठ दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. नाले सफाईचा फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी साचले आहे. ड्रेनेज लाईनचे घाण पाणी चोकअप होऊन ते बाहेर उघड्यावर येत आहे. तसेच काही भागांमध्ये टायर नारळाच्या करवंट्या, जुनी प्लॅस्टिकची भांडी, कुंड्या आदि टाकाऊ वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे आदि साथींचे आजार तसेच डेंगू सारखे माणसांचा जीव घेणारे आजारी रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.
मारुती भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यापूर्वी धुराडे फवारणी (फॉमिंग) औषध फवारणी, डबक्यांमध्ये ऑइल टाकणे, गप्पी मासे सोडणे आधी उपाययोजना केल्या जात होत्या. त्यावर महापालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करत होती. दरवर्षीच्या बजेट प्रमाणे यावर्षीच्या बजेटमध्ये देखील कोट्यावधीच्या आर्थिक तरतुदी असताना धुराडे फवारणी (फॉमिंग) औषध फवारणी, डब्यात ऑइल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपायोजना करताना महापालिका दिसत नाही. त्यामुळे या पुढच्या काळात डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांचा फैलाव शहरात अधिक वेगाने होऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून व्यापक जनजागृती व योग्य त्या उपाययोजना राबवल्यास या शहरातील अनेक सामान्य नागरिकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर