Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव अमुलाग्र क्रांतिकारक !

“आज भारतवर्षात किती लोकांना हे नाव माहीत आहे? किती लोक त्यांच्या आठवणींनी शोकाकुल होऊन अश्रू ढाळतात ? ह्या कृतघ्न भारताने अशी कितीतरी रत्ने गमावली आहेत, पण क्षण मात्र सुद्धा दुःखाचा लवलेशही अनुभवलेला नाही. ते सच्चे देशभक्त होते. त्यांच्या हृदयात देशासाठी तळमळ होती. त्यांना भारताची प्रतिष्ठा उंचावलेली बघायची होती, त्यांना भारताला उन्नतीच्या शिखरावर पोहोचवायचे होते; आणि तरीही भारतातील फारच थोड्या लोकांना त्यांचे नाव माहित आहे. त्यांची कदर कोणी केली?” हे वाक्य आहेत शहीद भगतसिंग यांनी लिहिलेल्या त्यांच्यापूर्वी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लढलेल्या एका महान क्रांतिकारक सुफी अंबा प्रसाद यांच्या विषयीच्या लेखात. (Martyrs day)

---Advertisement---

आज तेच शब्द तंतोतंत लागू पडतात ते शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्याविषयी ! भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात भारतीय क्रांतिकारक म्हणून शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे स्थान अति उच्च पातळीवरील आहे. या महान क्रांतिकारकांनी आपल्या भारत देशातील जनतेला सुखाने आणि समाधानाने कसे जगता येईल, यासाठीचे विचार तत्कालीन परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत, त्यांचे हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहीद भगतसिंगांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून तत्कालीन परिस्थितीमध्ये भरपूर लिखाण केलेले होते. त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले. (Martyrs day) त्या महान क्रांतिकारकांचा आज 23 मार्च हा स्मृती दिवस, त्यांच्या या स्मृती भारतीय लोकांच्या हृदयात वेगवेगळ्या पद्धतीने जिवंत आहेत. आजही मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पुस्तक प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण ठरलेले पुस्तक म्हणजे शहीद भगतसिंग यांची जेल डायरी हे आहे.

शहीद भगतसिंग यांनी २३ वर्षे, ५ महिने २३ दिवसांचे आयुष्य जगले, या अतिशय अल्प आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठे कार्य केले. भगतसिहांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी झाला होता, त्यावेळी इंग्रजांच्या बंगालच्या फाळणी करण्याच्या धोरणाविरुद्ध वंग – भंग आंदोलन सुरू होते. ते दोन वर्षांचे असताना शेतकऱ्यांचे आंदोलन चालवणारे त्यांचे काका सरदार अजितसिंह यांना भूमिगत व्हावे लागले. त्यांचे दुसरे चुलते सरदार स्वर्ण सिंह वयाच्या पंचविसाव्या वर्षी ब्रिटिशांच्या तुरुंगात छळयातनामुळे मृत्यू पावले तेव्हा भगतसिंग तीन वर्षाचे होते, या सर्व देशातील गुलामगिरी संपवून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या कुटुंबात सरदार किशनसिंह यांच्या पोटी शहीद भगतसिंग यांचा जन्म झालेला होता.

---Advertisement---

शहीद भगतसिंग यांना वयाच्या बाराव्या वर्षी एका भयानक प्रसंगाने अधिकच टोकदार, लढाऊ विचारांचे बनवले, तो प्रसंग म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड ! वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी मुलांची संघटना बांधली, त्यानंतर इयत्ता नववीत शिकत असताना म. गांधीजींच्या आवाहनानुसार शाळा सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली, असहकार आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी चौरी चौरा येथे पोलिसांसह चौकी जाळली, या घटनेमुळे महात्मा गांधीजींनी हे आंदोलन मागे घेतले. त्यावेळी ते पंधरा वर्षाचे होते. वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडून ते कानपूरला गेले. त्यानंतर त्यांचा प्रवास आपल्याला चकित करणारा आहे, पुढे त्यांनी शिक्षक, अनेक वर्तमानपत्रातून टोपणनावाने किरती, प्रताप, महारथी, चॉंद, फांसी, अर्जुन यामधून लिखाण करणारे पत्रकार, नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, त्या काळात त्यांनी प्रचंड अभ्यास केला, सम्राट चंद्रगुप्त, भारतदुर्दशा, राणा प्रताप अशा विविध नाटकांमधून काम केले.

हे सर्व करत असताना संघटनात्मक पातळीवर विविध क्रांतिकारकांशी त्यांनी संपर्क केले, हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी ही संघटना पूर्वीपासून क्रांतिकारक कार्यामध्ये अग्रेसर होती, या संघटनेत रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक लढाऊ क्रांतिकारक होते, या संघटनेच्या सहभागानंतर शहीद भगतसिंग यांनी या संघटनेचे नाव बदलून हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट आर्मी असे ठेवले, त्यासाठी त्यांनी आग्रा येथे सर्व क्रांतिकारकांची बैठक घेतली होती.

भगतसिंगांनी या देशातील विविध समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजनाही सांगितल्या होत्या, त्यांचे सहकारी आणि भगतसिंग हे सातत्याने एकमेकांशी विचारविनिमय करून भारत देशाला एक सुंदर आणि महान देश बनवण्यासाठी काय काय करता येईल याचे प्रयत्न सातत्याने करत होते. (Martyrs day)

त्यासाठी त्यांनी त्यांच्या पूर्वी ज्या महान क्रांतिकारकांनी या देशांमधून इंग्रजी साम्राज्याचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले, त्या क्रांतिकारकांविषयी खूप अभ्यास केला होता. जगभरातील ज्या ज्या क्रांतिकारकांनी अनेक देशांमध्ये चांगली व्यवस्था प्रस्थापित करून तेथील जनतेला विकसित बनवले आणि त्यांचे देश प्रगत बनवले त्या सर्व क्रांतिकारकांचा इतिहास सुद्धा भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेला होता. कारण त्यांनी मदनलाल धिंग्रा, सूफी आंबाप्रसाद, बलवंत सिंह, डॉक्टर मथुरा सिंह, शहीद कर्तारसिंह सरभा, अमीरचंद, अवध बिहारी, भाई बालमुकुंद, बसंतोकुमार विस्वास, भाई भागासिंह, भाई वतन सिंह, मेवासिंह, काशीराम, गंधासिंह, जगतसिंह, बंतासिंह धामियां, रंगा सिंह, वीर सिंह, उत्तम सिंह, अरुडसिंह, बाबू हरिनाम सिंह, सोहनलाल पाठक, भाई रामसिंह, भानसिंह, उधमसिंह, खुशीराम, बोमेली युद्धातील चार हुतात्मे, धन्नासिंह, वर्यामसिंह धुग्गा, किसनसिंह गर्गज्ज, संतासिंह, दलिप सिंह, नंद सिंह, कर्मसिंह या सर्व क्रांतिकारकांविषयी लिहून ठेवलेले अनेक लेख आपणास आढळून येतात.

अन्यायाच्या विरोधात लढत असताना आपली भूमिका सर्वसामान्य भारतीयांपर्यंत कशी जाईल त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून आपल्या प्रत्येक कृती मधून आजूबाजूच्या संपूर्ण भारतीयांना जागृत करण्याची एक अनोखी पद्धत अवलंबलेली आपणास दिसते. ज्या पद्धतीने लाला लजपत राय यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, त्याचा बदला म्हणून शहीद भगतसिंग यांनी सॉंडर्सचा वध केला, चुकीचे कायदे सरकार आणत असताना असेंब्ली मध्ये कोणत्याही व्यक्तीला इजा होणार नाही अशा पद्धतीचा अवलंब करत फक्त आवाज करणारे बॉम्ब फेकले, हे बॉम्ब फेकत असताना त्याच्यासोबतच बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी अशा आशयाची पत्रकेही फेकली होती. त्यानंतर त्या ठिकाणाहून पळून न जाता स्वतःहून अटक करवून घेतली होती. (Martyrs day)

या अटकेनंतर इंग्रजांना भारतीय जनतेमधील रोष लक्षात आला होता, भगतसिंग यांनी माफी मागावी आणि इंग्रज त्यांना सोडून देतील अशा पद्धतीची व्यूहरचना ही इंग्रजांनी करण्याचा प्रयत्न केले असल्याचे आपल्याला इतिहासात स्पष्टपणे दिसते, पण भगतसिंग यांनी त्या स्पष्ट नकार दिला, आम्हाला एखाद्या वीर योद्धा प्रमाणे गोळ्या घालून मारावे अशी मागणीही त्यांनी केल्याचे आपणास दिसते.

न्यायालयामध्ये खटला चालत असताना आम्ही का लढत आहोत? इन्कलाब जिंदाबाद म्हणजे काय? अशा पद्धतीचे अनेक युक्तिवाद करून आपल्या जबानीतून सुद्धा आपला हेतू स्पष्ट केला आणि त्यामधून भारतीय जनतेला जागृत करण्याचे प्रयत्न केले. युवकांना विद्यार्थ्यांना आणि आपल्या सहकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी आपली मते त्या पत्रामधून मांडलेली दिसतात.
धर्म जात, राजकारण, भाषा, साहित्य, समाज आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारे विचार त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर मांडलेले आपणास दिसतात. अशा या महान क्रांतिकारकास आपण त्यांच्या शहिद दिनी (Martyrs day) अभिवादन केलेच पाहिजे.

ज्यावेळी अंधार जास्त असतो, त्यावेळी प्रकाशाचे महत्व अधिक असते, तसेच जागतिक स्तरावर विचारधारा जेव्हा संपतात त्यावेळी अविचाराचे राज्य येते, आणि आज अनेक राजकीय विचारवंत विचारधारा संपल्याचे सांगत आहेत, एका अर्थाने जग अविचारी बनत आहे, अशावेळी या महान अशा अमुलाग्र क्रांतीच्या नायकाचे महान विचार संपूर्ण मानव जातीला उन्नतीकडे घेऊन जाणारे ठरतील यात शंका नाही, म्हणून अशा या महान क्रांतिकारकाच्या विचारांचे स्मरण करून त्यांना प्रत्येक भारतीयांनी अभिवादन केले पाहिजे.
इन्कलाब जिंदाबाद !

  • डॉ संतोष रणखांब,
    सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख,
    प्राणिशास्त्र विभाग,
    कै. रमेश वरपुडकर कॉलेज,
    सोनपेठ, जि. परभणी.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार, दिशा सालियन प्रकरणी वडिलांचे गंभीर आरोप

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles