लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी शनिवारी (५ एप्रिल २०२५) रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्री ११ ते ११:३० च्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानी घडली. या घटनेत ते जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिरआहे. त्यांना तातडीने लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत जेवण केले आणि काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत गेले. काही वेळाने गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने कुटुंबीयांनी खोलीत धाव घेतली, तेव्हा मनोहरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी स्वत:च्या डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली होती. या घटनेमुळे घरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा – माजी मंत्री धनंजय मुंडे यांना माझगाव न्यायालयाचा दणका)
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे सहा वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी रात्रीच रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थान आणि रुग्णालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारणांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा –माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भर सभेत थोबाडीत, वाचा सभेत काय घडले)
कोण आहेत बाबासाहेब मनोहरे? | Babasaheb Manohare
बाबासाहेब मनोहरे हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. ते एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत प्रशासकीय वर्तुळात आणि स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)
प्रशासकीय वर्तुळात खळबळ
या घटनेमुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध दिशांनी तपास करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदवले जात आहेत. (हेही वाचा – नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला मजुरांचा मृत्यू)