जुन्नर : संयुक्त ग्रामपंचायत चावंड येथे महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामास दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी पुन्हा सुरुवात झाली. गावाचा विकास व्हावा, लोकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि गावातच रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने विविध योजना राबविण्यात येत आहेत.
मनरेगाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून लोकांना गावातच रोजगार निर्माण करुन दिला आहे. यामध्ये वृक्षारोपण, रस्ते निर्मिती, बांध बंधीस्तीची कामे, शोषखड्डे, गाईगोठे, कुक्कुटपालन यांसारखी अनेक कामांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.
याचबरोबर शेततळे तयार करणे, विहीर पुनर्भरण, सार्वजनिक शौचालय,रस्ते दुरुस्ती, रस्त्याच्या दुतर्फा गटारांची कामे, मातीचा बंधारा बांधणे, स्मशानभूमी तयार करणे, चावडी बांधणे या सारखी अनेक ग्रामसभेत मांडून या कामांची मागणी केली आहे.
रोजगार हमीच्या कामांमुळे लोकांना गावातच रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात कामाची मागणी वाढू लागली आहे. दुसऱ्यांच्या बांधावर काम करण्यापेक्षा गावातच काम करून गावाच्या विकासासाठी आपला हातभार लागत आहे आणि त्यातून रोजगार सुद्धा मिळत असल्याने कामगार समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी अनंता शेळकंदे, जाणकू लांडे, संगिता शेळकंदे, मीराबाई उतळे, तुळसाबाई उतळे, निंबाबाई शेळकंदे, शोभाताई मेमाणे, सखुबाई मेमाणे, इंदुबाई उतळे, आणि चंद्रभागा मेमाणे हे कामगार कामावर हजर होते.