नाशिक : आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने देशभरात ‘जवाब दो…’ आंदोलन करण्यात आले. त्याअनुषंगाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉ गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या सुत्रधरांना सरकार जेरबंद कधी करणार? याचे उत्तर सरकारकडून माग्ण्याकरिता ‘जवाब दो…’ आंदोलन करण्यात आले. या निदर्शनात समविचारी पक्ष संघटनांसमवेत नाशिकमधील कष्टकरी जनता मोठ्या संख्येत उपस्थित होती.
आपल्या राज्यातील लढवय्ये पुरोगामी, कृतिशील ख्यातनाम विचारवंत कॉग्रेड गोविंद पानसरे यांना कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. ते व त्यांच्या पत्नी कॉ. उमाताई पानसरे गंभीर जखमी झाल्या. यातून कॉ. उमाताई बचावल्या; परंतु २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान कॉ. गोविंद पानसरे यांचे दुःखद निधन झाले. या घटनेला आता आठ वर्षे होत आहेत; मात्र त्यांच्या हत्याऱ्यांना मुख्य सुत्रधारांना उद्यापही पकडले गेले नाही, त्यांना शिक्षा झालेली नाही.
आजपर्यंत तपास विशेष तपास पथक (एस.आय.टी.) कडे होता आणि आता तो दहशवाद विरोधी पथक (ए.टी.एस.) कडे सोपविण्यात आला आहे. आता एटीएसचे अधिकारी मा. न्यायालयातच म्हणतात “तपास हाती घेताच फरार आरोपिंना शोधणे कठीण आहे”. अशा टोलवाटोलवी मध्ये आणखी किती वर्षे लागणार?
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला, मंडल आयोगाच्या समर्थनार्थ प्रचार मोहिम केली, आरक्षणाच्या बाजुने कायम भूमिका घेतली, राजर्षि शाहु महाराजांचा वसा आणि वारसा कथन केला आणि एटीएसचे अधिकारी हेमंत करकरे ह्यांच्या मारेकऱ्यांविषयी आयपीएस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेले ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकावर १०० व्याख्याने आयोजनाचा संकल्प केला. या सर्व प्रकारामुळे धर्मांध, सनातनी विकृतींचे पित्त खवळले आणि त्यांनी कॉ. पानसरेंची हत्या केली. या पूर्वी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, कर्नाटकात गौरी लंकेश, कलबुर्गी या पुरोगामी प्रबोधनकारांनाही असेच संपविण्यात आले आहे.
आपल्या देशात भारतीय संविधान अस्तित्वात आहे, संविधानाने निर्माण केलेली न्यायालये आहेत. मात्र, ही मा. न्यायालयेही कोणत्या दबावाखाली वेळकाढूपणा करत आहेत ही बाब समजत नाही. एकीकडे बिल्किस बानोच्या बलात्कारी गुन्हेगारांना मुक्त करण्यात येते, त्यांचे सत्कार सोहळे आयोजित केला जातात आणि दुसऱ्या बाजुला उपेक्षित समूहाची बाजू घेणाऱ्या वयोवृद्ध विचारवंतांना संशयित म्हणून तुरुंगात वर्षोनवर्षे सडविण्यात येत आहे आणि पानसरे-दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना मात्र मोकाट फिरण्याची मुभा मिळते ही गंभिर बाब आहे.
कॉग्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना, हत्याऱ्यांना त्वरित जेरबंद करून त्यांना शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृह खाते, त्यांच्या तपासयंत्रणांना कार्यक्षमतेने कामाला लावून न्यायालयास योग्य ते पुरावे सादर केले पाहिजेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करून शिक्षा झाली पाहिजे यासाठी राज्य सरकारने न्यायालयात या अनुषंगाने योग्य तपास करून सक्षम पुरावे सादर केले पाहिजेत अशी मागणी या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी राजू देसले राज्य सहसचिव भा क प महाराष्ट्र, जिल्हा सहसचिव कॉ. दत्तू तुपे, राज्य कौन्सिल सदस्य कॉ. विराज देवांग, शहर सचिव कॉ. तल्हा शेख, शहर सहसचिव कॉ. कैलास मोरे, जयवंत खडताळे, अरुण घोडराव, कॉ. हेमंत शिंदे, कॉ. मनोहर पगारे, कॉ. रफिक सैयद, कॉ. पुनमचंद शिंदे, कॉ. सुरेश गायकवाड, कॉ. मीनाताई आढाव, कॉ. दिनेश वाघ, कॉ. रवी उल्लहारे, कॉ.सचिन अल्हट, कॉ. राजू नाईक, कॉ.अवेश लोहिया, सुमित शर्मा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.