पिंपरी चिंचवड : आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. गेल्या 54 वर्षांत मी अनेक सरकार पाहिली. राज्याच्या बाबतीत केंद्राची भूमिका सहानुभूतीची असायची, पण सध्याचे केंद्र सरकार राज्य सरकारला खासकरून विरोधकांची सत्ता असणाऱ्या ठिकाणी कोंडी केली जात आहे. यासाठी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इंधन दरवाढ महागाई वरून शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलतंय, केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलतंय आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी – वेगळी आहे. सामान्यांचे प्रश्न वाढत आहेत. पण केंद्राला याची आस्था नाही. प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतच आहेत हे असं कधी घडलं नव्हतं. केंद्र म्हणतं आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने हे होतंय. पण काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी केंद्राने आपल्या देशात किमती कमी केल्या नाहीत. इतर देशात मात्र किंमती कमी होतायेत. केंद्राने या दरवाढीतून उत्पन्न वाढविण्याचे स्रोत निर्माण केले आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सलग दहा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तेव्हा भाजपने ओरड सुरू केली होती. पण आज मात्र ते गप्प आहेत.
महाराष्ट्रामधील विज संकटावर बोलताना शरद पवार म्हणाले, ”महाराष्ट्र सरकार कडे तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. म्हणून कोळसा समस्या निर्माण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे ती मान्य आहे. ती थकबाकी आठ – दहा दिवसांत दिली जाईल त्याची तरतूद केली आहे’. मात्र केंद्राकडे राज्याचे ३५ हजार कोटी बाकी असल्याच्या मुद्याकडे पवारांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे कोळश्याचे तीन हजार कोटी राज्याकडे बाकी आहेत, म्हणून आरोप करायचा. मात्र केंद्राकडे ३५ हजार कोटी बाकी आहेत त्या विषयी काहीही बोलायचे नाही, असा आरोप पवारांनी बोलताना केला आहे.
इडी सारखी काहीतरी संस्था आहे, हे काही वर्षांपूर्वी खूप कमी लोकांना माहित होतं. मात्र आज इडीचं नाव रोज ऐकायला येते. आणखी एका संस्थेचे नाव रोज ऐकायला येतं ते म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. आमचे प्रवक्त्ते नवाब मलिक यांच्या जावयाच्या मागे एनसीबी चा ससेमिरा लावून त्रास दिला. परंतु त्यांना जामीन मिळाला अशा शब्दात शरद पवारांनी तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एनसीबी च्या कारवाई वर शरद पवार यांनी टीका केली आहे. एनसीबी कारवाई करताना जे पंच आणते, ते पंच स्वतः गुन्हेगार आहेत. पंच गुन्हेगार आहे कळल्या नंतर ते पंच लगेच फरार झाले, ते पंच आज सापडत नाहीत. अशाच एका पंचाविरोधात पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. गुन्हेगार पार्श्वभूमी असलेलं पंच आणायचे आणि चांगल्या लोकांविरोधात खोटे नाटे पुरावे तयार करून गुन्हे दाखल करायचे असा आरोप पवारांनी तपास यंत्रणांवर केला आहे.