पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, मोशी खाण येथे गणेश विसर्जनासाठी पुरेसे कर्मचारी आणि यंत्रणा कार्यान्वित ठेवणे तसेच सर्व घाटांवर निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणे, कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता आणि डागडुजी करणे अशा सुचना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला दिल्या असून लहान गणेश मुर्तींचे विसर्जन महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे तसेच इको फ्रेंडली बाप्पाचे विसर्जन घरी स्वच्छ पाण्यात करावे आणि नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले आहे. Inspection of Visarjan Ghat by commissioner in the background of Ganeshotsav
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज शहरातील सर्व प्रमुख गणेश विसर्जन घाटांची तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, सह शहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, अमित पंडित, राजेश आगळे, शितल वाकडे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टुवार, शशिकांत मोरे, देवेंद्र बोरावके, अनिल शिंदे, दिलीप धुमाळ, जहिरा मोमीन, विनय ओहोळ, अशोक जावळे, उप अभियंता हरविंदरसिंह बंसल, अनुश्री कुंभार, मनोहर जावरानी, महेश कावळे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, सामाजिक कार्यकर्ते श्री आसवानी, तसेच कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरवर्षी शहरात उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनसाठी घाटावर येण्याची शक्यता आहे. शिवाय गणपतीची प्रतिष्ठापना तसेच विसर्जनासाठी शहरातून निघणाऱ्या मिरवणुकांची संख्या दरवर्षी जास्त असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व विसर्जन घाटांवर भाविकांसाठी सुरक्षा, आरोग्य, आपत्तीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केलेल्या प्रमुख स्थळांमध्ये मोशी येथील इंद्रायणी नदी विसर्जन घाट, रावेत येथील जाधव विसर्जन घाट, थेरगाव चिंचवड पूल विसर्जन घाट, चिंचवड येथील सुभाष घाट, पिंपळेगुरव येथील पूण्यश्लोक अहिल्यादेवी घाट, सांगवी घाट तसेच वेताळ महाराज घाट, वाकड गावठाण येथील विसर्जन घाट, वैभवनगर, पिंपरी येथील कृत्रिम विसर्जन घाट या स्थळांचा समावेश होता.
या ठिकाणांची पाहणी करत असताना आयुक्त शेखर सिंह यांनी घाटांवर दिशादर्शक व स्थळदर्शक फलक लावण्यात यावे, विसर्जन घाटांवरील निर्माल्यकुंडांची ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी फलक लावावेत, जीवनरक्षकांची नेमणूक करून मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय साधावा, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, विसर्जन घाटांवर सुशोभीकरण करण्यात यावे अशा सूचना संबंधित क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.