पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : सारथीच्या वतीने संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप देण्यात यावी, या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सारर्थीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या 22 दिवसापासून कोल्हापूर या ठिकाणी देखील बेमुदत सारथी संशोधकांचे साखळी उपोषण चालू आहे.
तसेच, बार्टीप्रमाणे यांना विद्यापीठ दिनांक पासून फेलोशिप देण्यात यावी, ही मागणी देखील करण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांना निवेदन देण्यात येत आहेत. पुणे विभागातील पुणे, नगर, नाशिक, सोलापूर येथून संशोधक विद्यार्थ्यांनी कालपासून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संशोधक निखिल मगर, शिवव्याख्याते सौरभ शिंदे, ऋषिकेश लबडे, ह.भ.प अर्जुन महाराज साळुंखे, स्वामी तिडमे, तुकाराम जाधव, तुकाराम शिंदे, रोशन काटे, योगिता अजबे, अपेक्षा शिंदे, आणि निलेश हांडे हे विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत.
मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.