भरमसाठ शुल्कवाढ व इतर मागण्यांसंदर्भात संविधानिक मार्गाने विद्यार्थी रस्त्यावर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात अनावश्यक शुल्कवाढ झाली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांनी वारंवार प्रशासनाला निवेदन दिलीत, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. म्हणून विद्यापीठातील विद्यार्थी आणि विविध संघटना मिळून आजपासून विद्यापीठ मुख्य इमारत आवारात आजपासून (दि. ११ जुलै) ते मागण्या मान्य होईपर्यंत संविधानिक मार्गाने बेमुदत घंटानाद आंदोलन करणार आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.
विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीसंदर्भात विविध संघटना व विद्यार्थी यांनी निवेदने देण्यात आली. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. शेवटी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिल्यावर एक समिती विद्यापीठाने गठीत करण्याचे सांगण्यात आले. मात्र या समितीकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक निर्णय घेण्यात आले नाहीत. विद्यापीठातील या संपूर्ण अजब कारभाराचा थेट विद्यार्थ्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होणार आहे, म्हणून आजपासून ते आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत घंटानाद आंदोलन करत आहोत, असे आंदोलनार्थी विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
१) पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.ची शुल्कवाढ पूर्ववत करणे.
२) वसतिगृहाची शुल्कवाढ पूर्ववत करणे.
३) विद्यापीठाशी संलग्नित संशोधन केंद्रांचे शुल्क हे विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे.
४) संशोधक विद्यार्थ्यांचे वसतिगृह लवकरात लवकर चालू करणे.
५) पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची बंद केलेली अधिछात्रवृत्ती सरसकट पुन्हा चालू करणे.
६) अनिकेत कँटीन आणि झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे पूर्वीच्याच जागेवर तत्काळ सुरू करणे.