दिल्ली : २३ मे २०२३ रोजी पहिले पी. सुंदरय्या स्मृती व्याख्यान दिल्लीच्या हरकिशन सिंह सुरजीत भवनात माकपचे पॉलिटब्युरो सदस्य प्रकाश कारत यांनी दिले. व्याख्यानाचा विषय होता, “पी. सुंदरय्या यांचे कृषी प्रश्नाला योगदान आणि त्याची सद्य काळातील वैधता”.

पी. सुंदरय्या हे लढाऊ स्वातंत्र्यसैनिक तर होतेच, शिवाय तेलंगणच्या शेतकरी-शेतमजुरांच्या ऐतिहासिक जमीनदारशाहीविरोधी सशस्त्र संग्रामाचे ते महान नेते होते आणि १९६४-७६ या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते पहिले राष्ट्रीय सरचिटणीस होते.

दिल्लीच्या पी. सुंदरय्या स्मृती ट्रस्टने हे व्याख्यान आयोजित केले होते. त्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे हे होते, तर प्रास्ताविक किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. विजू कृष्णन यांनी केले. किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हनन मोल्ला व राष्ट्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद मंचावर होते.

सुरजीत भवनाचे सभागृह तुडुंब भरले होते. श्रोत्यांमध्ये अनेक तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी होत्या. सभागृहात जागाच नसल्यामुळे त्यापैकी काहींना जमिनीवरच बसावे लागले.