सालभोये येथील विनायक भोये यांचा पुढाकार, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निर्णय
सुरगाणा (दौलत चौधरी) : केम पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले सालभोये हे गाव. या गावात दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याच गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक विनायक भोये यांच्या मातोश्रीचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोरोनाचा काळ असल्याने उत्तर कार्यात नातेवाईकांनी गर्दी करु नये. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव गावात होऊ नये यासाठी खबरदारी घेत अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आईचे उत्तर कार्याचा विधी पार पाडला. यावेळी आईच्या स्मृतिचा वसा जपण्यासाठी त्यांना वृक्षारोपण व संवर्धनाची गावात प्रथा सुरू केली आहे. आईचे वय जितक्या वर्षाचे होते तितक्या प्रमाणात 71 कडुलिंबाची झाडे स्मशानभूमीत तसेच दशक्रिया विधीच्या ठिकाणी, लगतच्या शेतात लावली आहेत.
गावातील ज्या कुटूंबात अशा मृत्यूच्या घटना घडतील त्या कुटुंबाने आपल्या घरातील व्यक्तींच्या आठवणी जपण्यासाठी आयुष्य जगलेल्या वर्षा इतकी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामी विनायक भोये यांना त्यांचे सहकारी पुंडलिक माळी, शिक्षक नामदेव जोपळे यांचे सहकार्य लाभले आहे. या घेतलेल्या निर्णयाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
“आईचे गावक-यांशी असलेले सलोख्याचे भाऊबंदकीचे नाते संबंधामुळे उत्तर कार्यात खुप गर्दी होणार होती. कोरोना काळ असल्याने तिच्या प्रेमाखातर गावक-यांनी सामूहिक प्रार्थनेसाठी एकत्र जमतील. त्यामुळे कोरोना पसरू नये याची दक्षता घेत प्रत्येकाने आपल्या घरीच सुरक्षित राहून तेथूनच आपल्या आईसाठी प्रार्थना करावी असे आवाहन केले. अनेकांनी आम्ही घेतलेल्या निर्णयाचे दुःखद प्रसंगातही कौतुक केले आहे.”
विनायक भोये, शिक्षक