आजमितीला सर्व असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेहाने आघाडीने घेतली आहे. सन २०३० साली भारतात ७ कोटी ९४ लाख व्यक्ती मधुमेहाच्या विळख्यात सापडतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. मधुमेह (Diabetes) हा लहान बालके, तरुण व्यक्ती व प्रौढ वयोगट तसेच स्त्री पुरुषांना होणारा आजार आहे. ह्याची लक्षणे काही महिने ते वर्षानंतर आढळून येतात. तसा हा चोरपावलांनी येणारा परंतु दीर्घकाळपर्यंत राहणारा व औषधोपचार करून नियंत्रणात आणला नाही तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवावर परिणाम करणारा आजार आहे.
• मधुमेह म्हणजे काय?
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह होय.
• मधुमेहाचे प्रकार :
मधुमेहाचे ५ ते ७ प्रकार आहेत. तथापि प्रामुख्याने ३ प्रकार महत्त्वाचे आहेत. टाईप १, टाईप २ व गरोदरपणातील मधुमेह हे मुख्यतः आढळून येतात.
आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रूपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पेंक्रीयाज या अवयावयातून स्त्रावनाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत समावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तीत एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. योग्य त्या प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व त्याचा हृदयविकार, मूत्रपिंड, मज्जातंतू व डोळ्यावर व पायावर परिणाम होतो.
टाईप १ मधुमेहात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया थांबते म्हणून ह्या गटात इन्सुलिन घेणं अत्यावश्यक आहे. टाईप २ मधुमेहात ही प्रक्रिया मंदावलेली असते. गरोदरपणात काही स्त्रियांना मधुमेह होतो तेव्हा अधिक काळजी घ्यावी लागते.
• मधुमेह नियंत्रणासाठी काय करावे ?
– मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान चार दिवस चार किलोमिटर तथा २० मिनिट जलद गतीने चालले पाहिजे.
– शरीर प्रकृतीनुसार सायकल चालविणे किंवा पोहण्याचा व्यायामही केला पाहिजे.
– आहारामध्ये गोडपदार्थ, तेलकट व तळलेले पदार्थ टाळावेत. आहारामध्ये अधिक तंतुमय पदार्थांचे सेवन करावे.
– आपल्याला दिवसभरात किती ऊर्जा खर्च करावी लागते, त्यावर प्रथिने, कार्बोहाइड्रेट व मेदघटक योग्य प्रमाणात ऊर्जा देणाऱ्या अन्नाचे सेवन करावे.
– मधुमेहाच्या औषधाबाबतीत अनेक गैरसमज आहेत. तज्ञांचा सल्ला न घेता झाडपाल्याने मधुमेह बरा होत नाही व शरिरातील साखरेचे प्रमाण वाढून आजार वाढतो.
– आंधळेपणाने व गैसमजुतीवर आधारित कोणतेही उपचार मधुमेहासाठी करू नये.
– तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व सल्ल्याने मधुमेहावर औषधोपचार करावा. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण त्यांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासून घ्यावी.
– टाईप २ मधुमेहातही काही रुग्णान्ना इन्सुलिन घ्यावे लागते तेव्हा काहीही किंतू परंतु न करता इन्सुलिन घ्यावे.
– योग्य प्रमाणात औषधोपचार घेतल्याने मधुमेह नियंत्रणात राहून शरीरावर दुष्परिणाम होत नाही.
– मधुमेहाची भीती न बाळगता नियमितपणे व्यायाम व औषोधोपचार घेतल्यास त्याच्यावर नियंत्रण मिळविता येते.
– डॉ.किशोर खिल्लारे, मधुमेह तज्ज्ञ
जन आरोग्य मंच, पुणे