Home राष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१व्या जयंतीदिनी अखिल भारतीय किसान सभेतर्फे अभिवादन !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१व्या जयंतीदिनी अखिल भारतीय किसान सभेतर्फे अभिवादन !

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज (१९ फेब्रुवारी १६३० – ३ एप्रिल १६८०) हे एक महान नेते आणि लढवय्ये राजे होते. महात्मा जोतीराव फुले यांनी त्यांचा गौरव ‘रयतेचा राजा’ या शब्दांत केला होता. छत्रपती शिवाजी यांनी जुलमी मोघल साम्राज्याविरुद्ध जबरदस्त लढा दिला, पण त्यांचा निखळ धर्मनिरपेक्ष बाणा जिझिया कराविरुद्ध त्यांनी औरंगजेबाला लिहिलेल्या गाजलेल्या पत्रातून स्पष्ट होतो. त्यांनी धर्म व जातीच्या सर्व भिंती भेदल्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या लढाऊ सैन्यामध्ये या सर्व विभागांचे प्रतिनिधित्व होते. त्या सरंजामी काळातही महिलांचा त्यांनी नेहमीच सन्मान केला. 

‘शिवाजी कोण होता?’ या शहीद कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट पुस्तकात शिवाजी महाराजांचे हे सर्व पैलू त्यांनी उत्तमरीत्या रेखाटले आहेत. शिवाजी महाराजांच्या या असामान्य गुणवैशिष्ट्यांमुळेच आज सुमारे ४०० वर्षांनंतरही शेतकरी समुदाय आणि सर्वसामान्य जनतेसाठी ते आराध्यदैवत आहेत. 

आज दिल्लीच्या सीमेवर लाखों शेतकऱ्यांना तीन महिने प्रचंड थंडीपावसात खितपत ठेवणाऱ्या भाजपच्या केंद्रातील संवेदनशून्य राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांनी चाबकाने फोडून काढले असते. तसेच शिवाजी महाराजाना धादांत खोटा धर्मांध रंग चढवणाऱ्या आरएसएस, भाजप व इतरांवर त्यांनी आसूड ओढले असते. 

आज सुरू असलेला अभूतपूर्व संयुक्त देशव्यापी शेतकरी लढा छत्रपती शिवाजी यांच्या जीवनकार्यातून आणि अन्यायाविरुद्धच्या त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत आहे, आणि हा लढा विजयी होईपर्यंत तो जास्त व्यापक आणि तीव्र करण्याची प्रतिज्ञा करत आहे, असेही अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस हनन मोल्ला म्हणाले.