मुंबई : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार देखील अस्थिर बनले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या दिवशीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राज्यपालांनी कोरोनावर आता मात केली आहे. सध्या राज्यपाल कोश्यारी यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा राजभवनावर दाखल होणार आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजभवन हे आता राजकारणाचे महत्वाचे केंद्र बनणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यपाल राजभवनावर नसल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग मंदावला होता. आता एकनाथ शिंदे यांचा गट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्याची शक्यता आहे.