ऑनलाईन बुकींगमध्ये महिला पर्यटकांना 50 टक्के सवलत
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च दरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस मध्ये महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी पत्रपरिषदेत दिली.पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टस मध्ये महिला दिनानिमित्त 8 दिवस आणि वर्षभरात इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस ऑनलाईन बुकींग केल्यानंतर या सवलतीचा घेता येणार आहे. विविध ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या महिला आणि त्यांच्या कुटूंबियांना या रिसॉर्टस मध्ये लाभ घेता येणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त नागपूरच्या पर्यटक निवास परिसरात 6 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. फॅशन शोचे आयोजन करण्यात आले असून यात महिलांना सहभागी होता येणार आहे.महिला बचत गटांना संधी पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासोबतच त्यांच्या आर्थिक विकासाकरिता अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या परिसरात महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल व जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पर्यटक निवास आता महिलांकडे
पर्यटन विकास महामंडळाने संभाजीनगर येथील पर्यटक निवास महिलांकडे दिले आहे. नवी मुंबईतील खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टॉरेंट पूर्णतः महिला संचालित करीत आहे. यानंतर आता नागपुरातील पर्यटक निवास सुध्दा महिलांकडे सोपविल्या जाणार आहे.
नवेगावखैरीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास
गोसीखुर्द जलाशयात जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याकरीता 101.95 कोटींच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. लवकरच येथे जल पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने भंडारा जिल्हयाचा पर्यटन विकासासोबत रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय पारशिवनी तालुक्यातील नवेगावखैरी येथे पर्यटनाच्या दृष्ट्ीने विकास करण्याकरीता प्रस्ताव विचाराधीन आहे. रामटेक, आंभोरा, नवेगाव, नागझिरा, ताडोबा, बोर, मेळघाट अभयारण्य, चिखलदरा, खेकरानाला, खिंडसी, बोरडॅम, घोडाझरी, बोदलकसा जलाशय, चांदपूर, खामतलाव, सेवाग्राम, पवनार, आनंदवन हेमलकसा सामाजिक उथानाचे केंद्र, सिताबर्डी किल्ला, नगरधन, चांदा, गावीलगड, नरनाळा किल्ले आदी ठिकाणी पर्यटक वाढविण्यासोबत निवास आणि इतर सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांसाठी खुशखबर…
संबंधित लेख