राज्यातल्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघातून महाविकासआघाडीचे सुधाकर आडबाले विजयी झाले आहेत.
आडबाले यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये रणजीत पाटील हे पिछाडीवर आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काळे यांना विक्रमी आघाडी मिळाल्यामुळे त्यांचा विजयही जवळपास निश्चित झाला आहे. तर नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत, त्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत झालेल्या भाजपच्या निराशाजनक कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपने अनेक वर्षांनी जिंकली. नागपूरची जागा शिक्षक परिषदेला हवी असल्यामुळे ती आम्हाला लढवता आली नाही, ती जागा जिंकली नाही, याचं दु:ख आहे.
अमरावतीमध्ये अपेक्षित मतं मिळाली नाहीत,’ असं फडणवीस म्हणाले. मराठवाड्यामध्ये चुरस सुरू आहे. आम्ही चांगल्या प्रकारे लढलो. अमरावतीमध्ये आम्ही बऱ्याच आकड्याने मागे आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
पदवीधर-शिक्षक निवडणुकीत भाजपला हादरे, फडणवीसांची पहिली रिएक्शन
- Advertisement -