मुंबई : भीमा कोरेगावला १ जानेवारी २०१८ ला झालेल्या हिंसाचाराशी एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही, अशी साक्ष त्या घटनेचे तपास अधिकारी गणेश मोरे यांनी दिली आहे. हे ध्यानात घेऊन त्यासाठी तुरूंगात डांबलेल्या सोळा विचारवंत कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांना त्वरित मुक्त करावे, अशी आग्रही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
नारकर म्हणाले, जे. एन. पटेल चौकशी आयोगासमोर तत्कालीन तपास अधिकारी गणेश मोरे यांनी दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण आहे. त्या सोळांपैकी स्टॅन स्वामी यांचे तुरुंगातच निधन झाले. खोटा खटला रेंगाळत ठेवून उरलेल्या पंधरा निरपराधांना केवळ भाजपच्या राजकीय स्वार्थापोटी छळण्यात येत आहे. भीमा कोरेगावच्या हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे थेट जबाबदार असल्याची साक्ष श्री. मोरे यांनी आयोगापुढे दिली आहे.
त्या वेळी गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आताही गृहखाते आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्थापोटी त्यांनी या विचारवंत कार्यकर्त्यांना गेली चार वर्षे तुरुंगात सडवत ठेवले आहे. महाराष्ट्र सरकारने एल्गार परिषद निमित्ताने दाखल केलेले या सोळाजणांवरील गुन्हे ताबडतोब मागे घ्यावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
केवळ भाजप नेतृत्वाच्या दुष्ट बुद्धीमुळे या निरपराध व्यक्तींचा जाणीवपूर्वक छळ करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. ते जितके दिवस तुरुंगात आहेत, तितक्या दिवसांची आर्थिक नुकसान भरपाई राज्य सरकारने दिली पाहिजे. तसे केल्यास देवेंद्र फडणवीस यांना अंशतः का होईना, पापक्षालनाची संधी मिळेल, असेही नारकर म्हणाले.
