(जुन्नर) :- पिंपरवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून पेसा अंतर्गत येणाऱ्या निधीतून १ लाख रुपये यासाठी खर्च करण्यात येत आहेत.
पेसा अंतर्गत येणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करून या अगोदरही एक विहीर पिंपरवाडी येथे खोदण्यात आली असून आता येथील युवक व सरपंच यांनी हे पाईपलाईनचे काम हाती घेतले आहे. यामुळे वर्षानुवर्षे पाण्यासाठी १ ते २ किलोमीटर पायपीट करून पाणी वाहून आणणाऱ्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा कमरेवर येणार आहे. या पाईपलाईनच्या कामामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी पाईप लाईनचा पाणी पुरवठा वर्षभर असावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
पिंपरवाडीमध्ये सध्या दोन शिवकालीन टाक्या व एक पेसा अंतर्गत खोदलेली विहीर आहे. तरीही हा पाणीसाठा लोकवस्तीच्या तुलनेत पुरेसा नसून अपुरा पडत असल्याचे समोर आले आहे. पिंपरवाडी येथे पाण्याचा साठा वाढविण्यासाठी अजून किमान दोन ते तीन शिवकालीन टाक्यांची अवश्यकता असून यासाठी पंचायत समितीकडे पाठ पुरावा करणार असल्याचे मत आंबे पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी व्यक्त केले.
तसेच पाईपलाईनच्या कामासाठी ग्रामपंचायत सदस्या रंजना घोडे व मीरा डगळे पिंपरवाडीचे पोलीस पाटील विष्णू घोडे, ग्रामस्थ दिगंबर घोडे, नवनाथ डामसे, कांशीराम डगळे, अक्षय घोडे,व DYFI चे गणपत घोडे यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.