Wednesday, February 5, 2025

खाद्यतेलाच्या किमती भिडल्या गगनाला ; महागाईवर नियंत्रण कधी ?

मुंबई : देशात कोरोना महामारीने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजगार, व्यापार, व्यवसाय बंद आहे. अनेक लोकांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. अशातच खाद्य तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत.

अगोदरच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त झालेले असताना आता जीवनावश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सामान्यांना महिन्याचे बजेट सांभाळणे अवघड झाले आहे. खाद्य तेल म्हणून सोयाबीन, रुई, नारळ, तीळ तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यातील शेंगदाणा तेल पहिल्यापासूनच सर्वात जास्त किमतीला विकले जात आहे. मात्र आता सूर्यफूल तेलाच्या किमती शेंगदाणाच्या बरोबरीत पोहचले आहेत.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावाने उच्चांक गाठलेला आहे, महिनाभरात खाद्य तेलाचे दर पंधरा ते वीस रुपयांनी वाढले असून आता सोयाबीन तेल तब्बल दीडशे रुपये किलो मिळत आहे, तर होलसेलला जवळपास १४५ चा भाव आहे. एवढे महागाचे तेल घेणे सर्वसामान्य नागरिकांना परवडेनासे झालेले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना मजुरीची कामे नसल्याने त्यांच्याकडे आर्थिक स्त्रोत नाही. त्यामुळे संसाराचा जेमतेम खर्च भागवित असताना एवढ्या महागाचे तेल खायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य तसेच मजूरवर्गाला पडलेला आहे.

सध्या राज्यातील कडक निर्बंधाचा फायदा घेत किरकोळ खाद्यतेल विक्रेते चढ्या दराने तेलाची विक्री करीत आहेत. त्यामुळे प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि खाद्य तेलाच्या किमतीवर कधी नियंत्रण येणार असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles