Thursday, February 13, 2025

मस्तपैकी दारू प्या, मस्तपैकी कोंबड्या खा, गांधीही घ्या, पण मतदान..; प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन काय?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या सरकारने देशाला महागाईच्या खाईत लोटले आहे.लोकांची लुटमार सुरू आहे. त्यांना सामान्य लोकांचं काहीही पडलेलं नाही. ठरावीक लोकांच्या हिताचं काम हे सरकार करत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवरून घालवलं पाहिजे, असं सांगतानाच
दारू प्या, मटण खा, पैसे घ्या, पण मतदान कमळाला करू नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यात आदिवासी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी भाजपसह संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली. कमळावाले आणि अर्धी चड्डीवाले जर मतदान मागायला आले तर त्यांना मतदान करू नका. ते तुम्हाला दारू देतील…. मस्तपैकी प्यायची….. कोंबड्या दिल्या तर मस्तपैकी खायच्या…. महात्मा गांधी आपल्याकडे पाठवले तरी घ्यायचे पण मतदान कमळाला….? नाही करायचं…. लोकशाही वाचली पाहिजे. ही लोकशाही वाचवायची असेल तर कमळातला स्वाद खाऊन टाका. पण त्याला मतदान करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. अर्धी चड्डीवाल्यांचं आदिवासींच्या संस्कृतीशी पटत नाही. म्हणून आदिवासीस संपला पाहिजे असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे माझी आदिवासींना विनंती आहे की, अर्धी चड्डी, फूल चड्डीवाल्यांपासून सावध राहा आणि त्यांच्या विरोधात उभे रहा, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

चार्जशीट कधी दाखल करणार?


एखादा बीजेपीत गेला की तो धुतल्या तांदुळासारखा पांढरा शुभ्र होतो. हसन मुश्रीफ जर बीजेपीत गेला तर बीजेपीवाले म्हणतील ते चुकून झालं त्यांच्याकडे काहीच मिळाले नाही. काल हसन मुश्रीफ यांच्या घरी धाड पडली. मी स्वागत करतो. पण सरकारला माझा सवाल आहे की चार्ज शीट कधी दाखल करणार…? आतापर्यंत यांनी 40 जणांवर धाडी टाकली. पण एकावरही एफआयआर दाखल केला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

हे तर दारुड्यांचं सरकार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस दरवाढ करून महिलांना पुन्हा धुरात लोटले आहे. एखादा दारुडा जसे घरातील सर्व काही विकतो. तसे हे सरकार देखील लुटारुंचे सरकार आहे, दारूड्यांचे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. अर्धे चड्डीवाले पूर्ण पँट घालायला लागले आणि आदिवासींचे धर्म बदलायला लागले, असं सांगताना संघाने आदिवासींची कशी धर्मांतरे घडवून आणली याची जंत्रीच त्यांनी सादर केली.

तर गावागावात गोध्रा होईल

गोध्राच्या दंगलीवरून त्यांनी भाजपला धारेवर धरलं. गोध्रा दंगलीवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत बसा. खुले आम चर्चा करा. माझं खुलं आव्हान आहे. याचं कारण असं की, रेल्वेचा डबा बाहेरून जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा. तो बाहेरून जळत नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो. म्हणजे आतून पेटवला म्हणजे जो कोणी आतमध्ये बसला असेल त्याने आतूनच पेटवला असेल. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इथे फसवेगिरीचा खूप मोठा षडयंत्र सुरू आहे. यावेळेस मला शंभर टक्के माहिती आहे की मुसलमान यावेळी कमळाला मतदान करणार नाही. कारण त्याला माहिती आहे की मी आता मतदान केलं तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांना श्रीमंत करण्याचा कार्यक्रम

यावेळी त्यांनी आदिवासींच्या विकास योजनांमुळे अधिकाऱ्यांचंच कसं भलं होतं, याची माहितीही दिली. दुर्देवाने आदिवासी विकास ही जी संकल्पना आहे, तीच मुळात सदोष आहे. दरवर्षी शासन या आदिवासी विकासावर एकंदरीत 9 हजार कोटी खर्च करते. मी सरकारला म्हटलं या योजना बंद करा. सर्व योजना बंद करा. आपण आदिवासी कुटुंब ठरवू आणि विकास योजनेची रक्कम या कुटुंबामध्ये वाटून टाकू. महिन्याला एका एका आदिवासी कुटुंबाला 8 ते 10 हजार रुपये येतील. तो आनंदाने आपलं जीवन जगेल. आपण कशाला त्यांना बकऱ्या द्या, कोंबड्या द्या हे करायचं? वाटून टाकू.

बँकेचं खातं खोलायला सांगू. त्यात पैसे टाकू. त्या 10-12 हजारात त्याला काय करायचं ते तो करेल. तिथला एक अधिकारी होता. म्हणाला, प्रकाशराव कल्पना चांगली आहे. पण आमचं काय होणार? त्यांची गरिबी हटेल पण आमची गरिबी वाढेल त्याचं काय? त्यामुळे आदिवासी विकास कार्यक्रम हा आदिवासींची गरिबी घालवण्याचा कार्यक्रम नाही. तर अधिकाऱ्यांना श्रीमंत करण्याचा कार्यक्रम आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच आदिवासींचं स्वायत्त मंडळ असावं आणि ते केवळ राष्ट्रपतींच्या अख्त्यारीत असावं, असंही ते म्हणाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles