नागपूर : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हा तर्फे आज महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांना आशा वर्कर यांच्या विविध प्रश्नांना घेऊन निवेदन सादर करत दीड तास चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक होऊन पुढे योग्य निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रत्येक यू पी एच सी मधील सर्व आशा वर्कर यांना आरोग्य वर्धीनीचा लाभ सरसकट देण्यात यावा. आशा ही स्वयंसेविका असल्यामुळे संप काळातील केलेल्या कामाच्या दिलेल्या माहितीनुसार सरसकट मानधन करण्यात यावे. हत्तीरोग निर्मूलन अभियानाच्या थकीत निधी आशा वर्कर यांना त्वरित देण्यात यावा. आशा वर्कर यांना ऑनलाइन कामाची सक्ती न करता डाटा ऑपरेटरकडे काम सोपवण्यात यावे.

तसेच ज्या आशा वर्कर ऑनलाईन डाटा एन्ट्री काम करत असतील त्यांना विशेष मोबदला देण्यात यावा. आशा वर्कर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री करता धमकावणाऱ्या वरिष्ठ कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. राज्य शासनाने त्वरित जी आर काढून न्याय न दिल्यास परत आशा वर्कर व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
महानगरपालिका मुख्यालय येथे मोठ्या संख्येने शहरी भागातील आशा वर्कर उपस्थित होत्या. चर्चेत प्रामुख्याने अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे, महासचिव कॉ. प्रीती मेश्राम, कॉ.रजना पौनीकर, लक्ष्मी कोत्तेजवार, कांचन बोरकर, आरती चांभारे, मंगला बागडे, रेश्मा सातपुते, भाग्यश्री गायके, प्रतिमा डोंगरे यांनी भाग घेतला.
