Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड‘सुविधा पार्क’ च्या रस्त्याला संरक्षण मंत्रालयाचा ‘हिरवा कंदिल’

‘सुविधा पार्क’ च्या रस्त्याला संरक्षण मंत्रालयाचा ‘हिरवा कंदिल’

गेल्या १३ वर्षांपासून प्रश्न अखेर सुटला, स्थानिक सोसायटीधारकांना मिळाला दिलासा

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग अर्थात ‘सीएमई’च्या हद्दीतील पुणे-नाशिक महामार्ग ते भोसरीतील सुविधा पार्क सोसायटीला जोडणारा १२ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे स्थानिक सोसायटीधारकांना दिलासा मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे भोसरी येथील स.नं.६८९, ६९० रहिवाशी विभाग दर्शविलेला असून, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.५० पासून सी.एम.ई. गेटकडे जाणारा रस्ता आहे. सन २०१० मध्ये सी. एम. ई. कडून सदर भागासाठी असलेला पोहच रस्ता संरक्षण विभागाचा असल्याने नागरीकांच्या वाहतुकीस सदर रस्ता बंद करण्यात आला होता. परिणामी, सुविधा पार्क सहकारी गृहरचना संस्थांच्या रहिवाश्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली होती. परंतु, ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती.

दरम्यान, सदरचे क्षेत्र महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आलेपासून पुणे- नाशिक रस्त्यापासून सी.एम.ई. गेटकडे जाणा-या सदर रस्त्याचे वेळोवेळी महानगरपालिकेमार्फत डांबरीकरण करण्यात आलेले आहे. तसेच, स्टेशन हेड क्वार्टर खडकी येथे दि. ०७/०९/२०२१ रोजी एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यानुसार, संरक्षण विभागाकडून महानगरपालिकेकडे मनपा प्रयोजनासाठी जागा हस्तांतरीत करणेबाबत सहमती दर्शवली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून भोसरी येथील सुविधा पार्क व बाजूच्या रहिवास भागासाठी असलेला पोहच रस्ता मिलीटरी विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणेबाबतचा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने आवश्यक तपशील व नकाशा संरक्षण मंत्रालय, दिल्ली यांना सादर करण्यात आला होता. त्याला संरक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

असा निघाला तोडगा!

सुविधा पार्क सोसायटीचे सदस्य व महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्टेशन कमांडंट, स्टेशन हेड क्वार्टर, खडकी, डिफेन्स इस्टेट ऑफिस, पुणे यांच्या समवेत महापालिका आयुक्त यांच्या दालनात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने बैठक झाली होती. यामध्ये सुविधा पार्क सोसायटीचे सदस्य न्यायालयातील प्रकरण मागे घेतील आणि महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाद्वारे स्वीकारला जाईल व ही जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केली जाईल. तसेच सुविधा पार्क सोसायटी सदस्यांनी न्यायालायात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत ७ दिवसांत सादर करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, सुविधा पार्क सोसायटीच्या प्रतिनिधींनी दावा मागे घेतल्यानंतर संरक्षण विभागाने दि.२३/०८/२०२३ रोजीच्या पत्रान्वये सदरचा रस्त्याचे काम करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती महापालिका नगर रचना विभागाचे सहायक संचालक संदेश खडतरे यांनी दिली.

जागेचे शुल्क भरावे लागणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मौजे भोसरी येथील सुविधा पार्क व बाजूच्या रहिवास भागासाठी असलेला पोहच रस्ता मिलीटरी विभागाकडून स.नं.६९० व २४९ येथील रहिवाशी विभागात सुविधा पार्क सहकारी गृहरचना संस्थांच्या इमारत व लगतच्या परिसरात पुणे-नाशिक रस्त्यापासून सी. एम. ई. गेटकडे जाणा-या संरक्षण विभागाच्या आख्त्यारीत असलेल्या रस्त्यापैकी १२.०० मी. रुंद व ४००.०० मी. लांबी अशा ४८००.०० चौ.मी. रस्त्याच्या जागेची र.रु.२३, २४,६४,०००/- इतकी रक्कम कळविलेली आहे. आहे. सदर रस्त्यामुळे सुविधा पार्क येथील व बाजूच्या रहिवास भागासाठी पोहच रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जागेचे शुल्क भरुन महापालिकेला हा रस्ता ताब्यात घ्यावा लागणार आहे.

माझ्या राजकीय जीवनाची सुरूवात ज्या परिसरातून झाली. त्या परिसरातील सुविधा पार्क व समर्पण सोसायटी आणि सभोवतालच्या भागातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित होता. सुमारे ७५ हून अधिक सदनिकाधारकांना रस्ताच नव्हता. त्यामुळे सोसायटीधारक नागरिकांनी न्यायालयातील याचिका मागे घेतली. त्यामुळे संरक्षण विभागाने सकारात्मक भूमिका घेत सदर रस्ता महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण करण्यास परवानगी दिली आहे. अत्यंत गुंतागुंताचा हा प्रश्न महापालिका, रहिवाशी आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्याने मार्गी लावला. प्रशासनाने पुढील कार्यवाही करुन रस्त्याचे काम पूर्ण करावे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा

संबंधित लेख

लोकप्रिय