घोडेगाव : सेंट्रल किचन बंद करून पूर्वीची शासकीय मेस पद्धत सुरू करा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच घोडेगाव, मंचर, जुन्नर येथील वसतिगृहाचे गृहपाल यांना देखील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदन देतेवेळी एसएफआय चे जिल्हा सचिव नवनाथ मोरे, जिल्हा समिती सदस्य योगेश हिले, रोहिदास फलके उपस्थित होते.
एसएफआय चे जिल्हा सचिव नवनाथ मोरे म्हणाले की, कोटमदरा (ता.घोडेगाव) येथे प्रकल्प कार्यालया अंतर्गत असलेल्या आंबेगाव, खेड व जुन्नर येथील ७ आश्रमशाळा, ७ वसतिगृह यांतील निवासी विद्यार्थ्यांना भोजन पुरविणे दि.१५ जून २०२३ पासून सुरु झाले आहे. प्रकल्पा अंतर्गत हि नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, या योजनेच्या पहिल्याच दिवसापासून जेवणाचा निकृष्ट दर्जा, जेवण वेळेवर न पोहोचणे, आहारात बदल इ. समस्या समोर आल्या आहेत. या समस्या त्या त्यावेळी विद्यार्थ्यांनी आणि एसएफआय संघटनेने गृहपाल, प्रकल्प अधिकारी यांना दर्शनास आणून दिलेल्या आहेत. मात्र या समस्यांवर आपल्या कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही, असेही म्हणाले.
भविष्यात या मध्यवर्ती भोजनगृहातून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि यासोबतच निकृष्ट दर्जाचे अन्न देखील पुरविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मध्यवर्ती भोजनगृह बंद करून पूर्वीची शासकीय मेस पध्दत सुरू करावी अशी मागणी एसएफआय ने केली आहे.
यावेळी बोलताना प्रकल्प अधिकारी म्हणाले, जेवनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकर प्रशासन, सेंट्रल किचन व्यवस्थापन व एसएफआय संघटनेच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊ.