नाशिक : कोविड-१९ साठी घोषित केलेल्या लॉकडाऊन मध्ये वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने वाहनाच्या विम्यापोटी घेतलेल्या प्रीमियमच्या रक्कमेपैकी ६ महिन्यांची रक्कम परत द्यावी अथवा विमा प्रीमियमच्या मुदतीत ६ महिन्याची वाढ करावी अशी मागणी सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व राज्य सरचिटणीस एम. एस. शेख यांनी भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाकडे केली आहे.
संपूर्ण देशभरात कोविड-१९ च्या साथीच्या रोगापासून बचाव होण्याकरिता २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रवासी व मालवाहतुकीवर पूर्णपणे बंदी आणण्यात आली. अत्यावश्यक सेवेसाठी कांही वाहनांना माल वाहतूक करण्याची परवानगी दिली. मात्र प्रवासी वाहनांना पूर्णपणे बंदी घातल्याने २४ मार्च पासून सलग ४ महिने प्रवासी वाहन प्रवासी सेवेकरिता सक्तीने बंद ठेवण्यात आले. अनलॉक ०१ मध्ये टॅक्सी आणि रिक्षांना प्रवासी संख्येवर निर्बंध करून वाहतूक करण्याची मुभा दिली. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस, व्हॅन, प्रवासी सेवा देणाऱ्या बसेस आजही पूर्णपणे बंद आहेत याकडे सिटू संघटनेने प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे .
मोटार वाहन कायद्यानुसार सर्व वाहनेही २४ मार्चपासून लॉकडाऊन संपायच्या कालावधीपर्यंत म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ना वापर या सदरात मोडली गेली आहे. केंद्रीय मोटार वाहन विभागाने दि. १ फेब्रुवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत वाहनांची कागदपत्रे जरी मुदत संपली असली तरी वैध असल्याबाबतचे परिपत्रक काढून वाहन चालकांना दिलासा दिला आहे. त्याच धर्तीवर लॉकडाऊनच्या काळात वाहनाचा वापर न झाल्याने वाहन ना वापर या सदराखाली असल्याने विविध विमा कंपन्याकडून वाहनांच्या प्रीमियमपोटी घेतलेली रक्कमेतील ६ महिन्याच्या प्रीमियमची रक्कम वाहन धारकास परत करण्यात यावी. अथवा वाहनावरील विम्याचा वापर न झाल्याने वाहनाच्या प्रीमियमची मुदत केंद्रीय मोटार वाहन विभागाच्या निर्णयाप्रमाणे ६ महिने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी डॉक्टर डी. एल. कराड, एम. एच. शेख, सीटूप्रणित वाहतूक समन्वय समितीचे निमंत्रक सलीम मुल्ला, रिक्षा टॅक्सी चालक युनियनचे संजय पवार, गोपाल जायभाये यांनी केली आहे.