पालघर, ता.२६ : सीटू संलग्न ठाणे-पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (लाल बावटा) तर्फे पालघर जिल्हा परिषद कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील आशांनी त्यांचे थकित मानधन, वाढीव मानधन, आशांसाठी आरोग्यविमा कवच, थकित करोना भत्ता व इतर प्रमुख मागण्यांसाठी जोरदार मोर्चा काढला.
दिवाळी तोंडावर आली तरी पाच महिन्यांचे पगार अडकवून ठेवल्याने संतप्त झालेल्या सुमारे २०० आशांनी थेट पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धीराम सालीमठ यांचे केबिन गाठून त्यांना घेराव घातला.
मोर्चेकऱ्यांच्या विविध मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून पाच महिन्यांचा थकित मोबदला व करोनाचे थकित मानधन हे येत्या २ दिवसांत आशांच्या खात्यांमध्ये वर्ग करणार, मानधन तसेच इतर भत्त्याचा दरमहा तपशील दर महिन्याला प्रत्येक आशाला देणार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कॅम्प लावून लवकरात लवकर विमा कवच तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आशांना जादा कामाचा बोजा लावण्यास मनाई करणार या व काही स्थानिक मागण्या मान्य केल्या आहेत.
या मोर्चाचे नेतृत्व सीटूचे नेत्या कॉ. प्राची हातिवलेकर, कॉ. सुनीता शिंगडा, कॉ. डॉ. आदित्य अहिरे, कॉ. हर्षल लोखंडे, कॉ. रमेश बीज, कॉ. हरेश वावरे, कॉ. ब्रिजेश यादव यांनी केले. मोर्चासाठी विविध तालुक्यांतून सुमारे २०० प्रमुख आशा उपस्थित होत्या.