चिंचवड : कृष्णानगर या दाट लोकवस्तीचा परिसरातून आकुर्डी चिखली या चारपदरी मुख्य रस्त्यावर सर्वात जास्त रहदारी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती आणि सर्वोपचार रुग्णालये, व्यापारी दुकाने, हॉटेल आहेत. या संपूर्ण रस्त्याचा दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात. फेरीवाले, हातगाडीवाले यांनी फुटपाथ, रस्त्यावर व्यवसाय थाटलेले आहेत.
येथील एक सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले म्हणाले की, थर्माक्स चौक ते साने चौकातील संपूर्ण परिसरात सुरक्षित वाहतूक असली पाहिजे. मनपाने नागरिकांच्या सोयीसाठी अधिकृत भाजी मंडई, मिनी मार्केट, हॉकर्स झोन निर्माण केलेले नाहीत. शेकडो निवेदने देऊनही रस्त्यावर अतिक्रमण करून नागरिकांची सुरक्षा रामभरोसे सोडली आहे.
या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसायासाठी विशिष्ट लोकांना हप्ते दिले जातात. हप्तेखोर आणि अतिक्रमण विभागामध्ये साटेलोटे असल्यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाने इकडे दुर्लक्ष केले आहे, नागरिकांसाठी रस्ते सुरक्षित ठेवणे ही मनपाची जबाबदारी नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वारंवार ट्राफिक जाम होऊन पीएमपीएल, रुग्णवाहिका आणि तातडीच्या वाहनांसाठी या रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग आणि अनधिकृत व्यवसायीकांवर कारवाई करून गरजूना मनपाने अधिकृत जागा आणि परवाने द्यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.